खिळे ठोकणाऱ्यांकडे नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष

अनधिकृत फलकबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत, त्यामुळे नवी मुंबईतील बेकायदा फलकबाजी काही प्रमाणात कमी झाली असली तरी आता झाडांच्या खोडांवर खिळे ठोकून फलक लावले जात आहेत. कोणतीही परवानगी न घेता झाडांना इजा पोहोचवून फलकबाजी करणाऱ्यांकडे पालिका मात्र दुर्लक्ष करत आहे.

झाडे लावण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी पालिकेच्या उद्यान विभागावर आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. एकीकडे पर्यावरणप्रेमी वृक्षांच्या संवर्धनासाठी झटत असताना राजकीय नेते आणि व्यावसायिक मात्र खिळे ठोकून वृक्षांचे नुकसान करत आहेत. उद्यान विभाागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत. ठाणे-बेलापूर मार्ग, पामबीच मार्ग, ऐरोली, घणसोली, रबाळे, कोपरखरणे येथील अंतर्गत रस्त्यांवर विविध संस्था आणि दुकानांच्या जाहिरातींचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. वाशीतील मिनी सी शोअर आणि सागर विहार या निसर्गरम्य ठिकाणी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. उद्यानातील अनेक झाडे नष्ट करण्यात आली असून कांदळवनाचे देखील नुकसान करण्यात आले आहे. एकीकडे पालिका ‘हरित नवी मुंबई’चे स्वप्न दाखवत असताना दुसरीकडे मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या झाडांच्या हानीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ऐरोली, कोपरखरणे आणि पाचबीच रोड या ठिकाणी सोसायटय़ा आणि दुकानांच्या सोयीसाठी रस्त्यालगतची झाडे तोडण्यात आली आहेत. शहरातील झाडांचे किमान सरासरी आयुष्य ५० ते १०० वर्षे आहे. मात्र, इजा झाल्यास ते १५ ते २० वर्षांनी घटू शकते, असे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येते. झांडाना खिळे ठोकणे हा गुन्हा आहे. महाराष्ट्र वृक्ष जतन कायदानुसार महानगरपालिकेला झाडांना खिळे ठोकण्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे अधिकार असल्याचे पर्यावरणप्रेमी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

सणासुदीत हॉटेल व व्यावसायिक दुकानांसमोरील, सोसायटय़ांतील झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात येते. अशी रोषणाई करण्यास कायदाने बंदी घालण्यात आली आहे. पण नवी मुंबईतील अनेक हॉटेल आणि दुकानांसमोरील झाडांवर सर्रास रोषणाई केली जाते. झाडांवर विद्युत रोषणाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी विभाग अधिकांऱ्याची आहे, असे नवी मुंबई उद्यान विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांनी स्पष्ट केले.

झाडावर खिळे ठोकून फलकबाजी करणाऱ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने वेळीच चाप लावावा. महानगरपालिकेकडे यासंदर्भात तक्रार देखील दाखल केली आहे. पालिकेने उपाययोजना न केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल.

बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष, पर्यावरण सेवाभावी संस्था

झाडांना खिळे ठोकून जाहिरातबाजी करणाऱ्यांच्या विरोधात याआधी दंड वसूल करण्यात आला आहे. झाडावर जाहिरात लावणारी व्यक्ती शोधून काढण्यात अडचण येते. पोलिसांनाही यासंदर्भात पत्र देण्यात येणार आहे. या पुढे झाडांवर खिळे ठोकल्यास पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील.

तुषार पवार, उपआयुक्त उद्यान विभाग, नमुंमपा