नवरात्र शुभेच्छांसाठी राजकारण्यांमध्ये चढाओढ

गणेशोत्सवात बेकायदा फलकबाजीने शहर विद्रूप केल्यानंतर राजकारण्यांना आता नवरात्रोत्सवाचे निमित्त मिळाले आहे. आठवडय़ावर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेत्यांनी शहरात अनेक ठिकाणी फलकबाजी करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाविकांना शुभेच्छा देणे नावापुरते असून प्रमुख चौकांमध्ये विरोधकांच्या आधी आपले फलक कसे लागतील, यासाठी हे नेते झटत आहेत. या फलकबाजीकडे पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नेहमीप्रमाणे काणाडोळा केला आहे.
उच्च न्यायालयाने अनधिकृत फलकांविरोधात कारवाईचे सक्त आदेश दिले असून या फलकबाजीसाठी पालिका आयुक्तांना दोषी धरण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी न्यायालयाच्या या आदेशाचे सर्रास उल्लंघन झाले होते. नवरात्रोत्सवात ही परंपरा सुरू राहणार असल्याचे दिसत आहे. घटस्थापना मंगळवारी असल्याने उर्वरित चार दिवसांत ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावून शहर विद्रूप करण्याचा विडा या नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलला आहे. हे फलक अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी अडथळ्याचे ठरत असून त्यामुळे अपघात होण्याचा धोकाही आहे.
कारवाई करणार
विभाग अधिकांऱ्याना या अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच फलक विनापरवानगी लावण्यात आले असतील तर संबंधितांकडून दंड वसूल केला जाईल.
सुभाष इंगळे, अतिक्रमण उपआयुक्त