अग्निसुरक्षा परवाना नसल्यास बार बंद ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश

कमला मिल परिसरात लागलेल्या आगीनंतर पनवेल पालिकेने हॉटेल, बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पनवेल शहर पालिका क्षेत्रातील सुमारे १२५ हॉटेल बारमालकांना फायर ऑडिट पूर्ण करेपर्यंत हॉटेल व बार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. पनवेल पालिकेने दारूबंदीचा प्रस्ताव संमत केला आहे, मात्र निम्म्यापेक्षा अधिक हॉटेल व बार मालकांनी यंदा फायर ऑडिट न केल्याने पनवेलमध्ये दारूबंदीपूर्वी बारबंदी झाल्याचे दिसते. पालिका प्रशासनाच्या या ठाम भूमिकेमुळे बारचालकांच्या संघटनेने बुधवारी दुपारी पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची भेट घेऊन काही दिवसांची मुदतवाढ मागितली. मात्र आयुक्तांनी त्यांना सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करा, नंतरच हॉटेल सुरू करा असे फर्मान सोडले.

पनवेल महापालिका क्षेत्रात सात लेडीज सव्‍‌र्हिस बार व इतर हॉटेल आणि परमिट रूम आहेत. बारमालकांनी डिसेंबर २०१६ पर्यंत अग्निशमन यंत्रणांसंदर्भातील प्रमाणपत्र मिळविले आहे. त्याचे नूतनीकरण झाले नसल्याने बारमालकांची कोंडी झाली आहे. बार सुरू ठेवण्यासाठी अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासोबत आरोग्य व अन्न औषधे प्रशासनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. बारमालकांनी बुधवारी आयुक्त शिंदे यांची भेट घेतली. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मिळवतो, मात्र तोवर बार सुरू  ठेवण्याची परवानगी द्या, अशी विनंती केली. मात्र, महापालिका आयुक्तांनी त्यास स्पष्ट नकार दिला.

पनवेल महापालिकेने दारूबंदीचा प्रस्ताव संमत केला आहे, आता हा चेंडू उत्पादनशुक्ल विभाग आणि पनवेलकरांच्या कोर्टात टोलावण्यात आला आहे.

मुदतवाढीस नकार

पनवेलच्या अग्निशमन यंत्रणेचे व त्यासंबंधी विभागाचे कार्यालय २४ तास सुरू ठेवू, मात्र मुदतवाढ देणार नाही. प्रमाणपत्र मिळत नाही, तोवर बार सुरू ठेवल्यास सील करण्यात येईल, असा सज्जड दम आयुक्त शिंदे यांनी बारमालकांना भरला.