खासगी जाहिराती संस्थांच्या माध्यमातून देखभाल

शहरातील विविध उड्डाणपूल, पनवेल महामार्ग, तसेच भूमिगत रस्त्यांवरील मोकळ्या जागांचे सुशोभीकरण, त्यांची देखभाल आणि निगा राखली जाणार आहे. यासाठी या जागांवर जाहिराती लावण्याचे हक्क संस्थांना दिले जाणार आहेत. हा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. खासगी आणि सार्वजनिक सहभागातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. पालिकेत नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

‘स्मार्ट सिटी’अतंर्गत पालिका पातळीवर शहरात विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत आहे. यातील जाहिरातीच्या माध्यमातून जनसंपर्क साधला जाणार आहे. जाहिरात उत्पन्नाचा स्रोत आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यात भर घातली जाणार आहे. त्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.  मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, पामबीच मार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय तिन्ही मार्गावरील २४ उड्डाणपुलांखाली तसेच २२ भूमिगत मार्गावरील मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या साऱ्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या संस्थांना अशा ठिकाणी जाहिरातीस मुभा दिली जाणार आहे.