सीवूड्स सेक्टर ४८मध्ये काम पूर्ण होण्याआधीच वाट अडवण्यास सुरुवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीवूड्स सेक्टर ४८ येथील नवरत्न हॉटेल ते डीएव्ही शाळेच्या परिसरात एकीकडे रस्ता रुंदीकरण करण्यात येत असताना दुसरीकडे याच रस्त्यावर बेकायदा पार्किंगही करण्यास सुरुवात झाली आहे. पालिका आणि वाहतूक विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. या परिसरात शाळा असल्यामुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याचा वेळेत इथे कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सीवुड्स सेक्टर ४८मध्ये पदपथ, गटारे, वीजव्यवस्था यांची कामे सुरू आहेत. नाले दुरुस्ती तसेच पदपथ कमी करून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले असतानाच प्रत्यक्षात त्याचा वापर बेकायदा पार्किंगसाठी केला जाऊ लागला आहे. साईमहल, अन्नपूर्णा, साईप्रसाद, ज्ञानेश्वर माऊली अशा अनेक सोसायटय़ा या भागात आहेत. डीएव्ही शाळेच्या समोर मोठे पदपथ होते व रस्ता मात्र अरुंद होता. त्यामुळे पालिकेच्या अभियंता विभागामार्फत या विभागातील पदपथ कमी करण्याचे व नाल्यांची व पथदिव्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्या जागेत बेकायदा वाहने पार्क केली जात आहेत. पदपथांवर वीज आणि गटारांची कामे सुरू आहेत. शाळेचे विद्यार्थी, पालक, नागरिक मोठय़ा प्रमाणात या रस्त्याचा व पदपथाचा वापर करतात.

३ कोटी १० लाखांची कामे सुरू असून लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पदपथ कमी करून रस्ता रुंद करण्यात येत आहे, मात्र नागरिक तिथेच वाहने उभी करत आहेत. वाहतूक विभागाने कारवाई करणे आवश्यक आहे.

– पंढरीनाथ चवडे, अभियंता, नवी मुंबई महापालिका

बेकायदा पार्किंग होत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यावर कारवाई करण्यात येते. डीएव्ही शाळेच्या परिसरात ज्या ठिकाणी पालिकेचे काम सुरू आहे, तिथे बेकायदा उभ्या करण्यात आलेल्या गाडय़ांवर कारवाई करण्यात येईल.

– प्रमोद शिंदे, वाहतूक अधिकारी, सीवूड्स वाहतूक नियंत्रण

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beginning to stop seawoods sector 48 before it was completed
First published on: 19-09-2018 at 03:34 IST