X

बेलापूर किल्ल्यावर १७ कोटींचा खर्च

 राज्य शासनाच्या आदेशांनुसार सिडकोने या किल्ल्याचा आराखडा तयार केला आहे.

पर्यटन स्थळ म्हणून सिडकोकडून विकास

पोतुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर पेशव्यांनी जिंकलेल्या नवी मुंबईतील एकमेव ऐतिहासिक वास्तू असलेल्या बेलापूर किल्ल्याचे जतन व्हावे, यासाठी १६ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी सिडकोने केली आहे. पुढील महिन्यात या कामाची रीतसर निविदा काढली जाणार असून नवीन वर्षांत प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे. शिवाय दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली असून किल्ल्याला पर्यटनाचे स्वरूप यावे, यासाठी सर्व आधुनिक सोयी सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

राज्य शासनाच्या आदेशांनुसार सिडकोने या किल्ल्याचा आराखडा तयार केला आहे. यात किल्ल्याच्या साफसफाईपासून पुनर्बाधणीचा समावेश आहे. दगडी पुनर्बाधणीत या किल्ल्याला पूर्वीचे रूप देण्यात येणार आहे. याचबरोबर  किल्ल्यावर पर्यटन वाढावे, यासाठी अ‍ॅम्फीथिअटर, ऑडिओ, व्हिडीओ सादरीकरण, कॅफेटएरीया, उपाहारगृह देखील उभारले जाणार आहेत. या किल्ल्याला असलेले दोन टेहाळणी बुरुज पुन्हा उभारण्याच्या कामाचाही यात समावेश आहे. शिवाय किल्ल्यावर प्रवेश करणारा आणि बाहेर पडण्याच्या मार्गाची देखील यात रचना असणार आहे. या सर्व कामांवर १६ कोटी ६५ लाख रुपये खर्च होणार असून पुढील महिन्यात २० नोव्हेंबरला या कामाची निविदा ठेकेदाराला दिली जाणार आहे.

शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. बेलापूर किल्ला आणि नवी मुंबईच्या दृष्टीने असलेले त्याचे महत्त्व लक्षात घेता विमानतळासारख्या मोठय़ा प्रकल्पांबरोबर सिडको ऐतिहासिक खुणादेखील जपण्याचा प्रयत्न करणार आहे.

डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंर्पक अधिकारी, सिडको

Outbrain