वृद्धाश्रम, अनाथाश्रमांना वाटप

गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात भाजीचे मळे फुलत असतील तर आपल्या वाणिज्य संकुलात ते का शक्य होणार नाही, अशा विचाराने नवी मुंबईतील ऐरोली येथील माइंड स्पेसच्या दारात विविध भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. ही भाजी खासगी स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना मोफत दिली जात आहे. दररोज ५० ते ६० किलो भाजीचे उत्पादन घेण्यात येत आहे. आयटी कर्मचाऱ्यांच्या या प्रयोगातून प्रेरणा घेऊन कंपनीच्या मागे असलेल्या चिंचपाडा झोपडपट्टीतील पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारे भाजी लागवड सुरू केली आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर पूर्वीच्या फिलिप्स कंपनीच्या आवारात आता के. रहेजा कॉर्पोरेशनने माइंड स्पेस हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे जाळे निर्माण केले आहे. तिथे ५० ते ६० आयटी कंपन्या असून सुमारे ५० हजार कर्मचारी दिवसरात्र काम करतात. कंपनीच्या फलोत्पादन विभागाने चार हजार चौरस फूट जागा सेंद्रिय खतावरील भाजी उत्पादनासाठी विकसित करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला.

कंपनीच्या उपाहारगृहामध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाते. स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे. आवारातील सांडपाणी वृक्षांसाठी वापरले जाते. याच खत-पाण्यावर कांदा, मुळा, भेंडी, प्लावर, कोबी, मिरची, टोमॅटो अशा ४० भाज्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे.

आयटी क्षेत्रातील तरुणांना शेतीची ओळख व्हावी यासाठी एका भागात गहू, बाजरी, भात यांचीही शेती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ थंड हवेच्या भागात उत्पादन घेतले जाणाऱ्या स्टॉब्रेरीची देखील लागवड येथील कर्मचाऱ्यांनी केली होती. ही स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीसारखी मोठी अथवा गोड नसली तरी त्या निमित्ताने तिचे उत्पादन कसे घेतले जाते याची माहिती तरी येथील कर्मचाऱ्यांना मिळत आहे.

प्रशिक्षित माळी या मळ्याची काळजी घेतात. प्रत्येक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काही वेळा निश्चित करून देण्यात आला आहे. ते गावातून आणलेले बी-बियाणेदेखील लावण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे तमिळनाडूतील हळद, जळगावची केळी, नागपूरची संत्री, पालघरचे चिकू इथे वाढू लागले आहेत. दर १५ दिवसांनी उगवणारी भाजी रहेजा कॉर्पोरेशन बरोबर संलग्न असलेल्या सामाजिक सेवा संस्थांना मोफत वाटली जाते.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तणावग्रस्त जीवनशैलीतून थोडीशी मोकळीक मिळावी, म्हणून कंपनीच्या हैद्राबाद, गोवा, मालाड येथील प्रकल्पांतही अशाच प्रकारे मळे विकसित करण्यात आले आहेत. जवळच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील यातून प्रोत्साहन मिळत आहे.

– राजेश, सुंदर राजन, प्रमुख, हॉर्टिकल्चरल विभाग, के. रहेजा