नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

गेले दहा महिने दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेले वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नववर्षांच्या पहिल्या दिवसापासून (१ जानेवारी) पुन्हा एकदा पडदा उघडणार आहे. एकमेव नाटय़गृह असल्याने प्रतीक्षेत असलेल्या नाटय़रसिकांची गैरसोय त्यामुळे टळणार आहे.

नवी मुंबईत वाशी सेक्टर १६ ए येथे वष्णुदास भावे हे एकमेव नाटय़गृह आहे. मात्र, त्यांची मोठय़ा प्रमाणात दुरुस्ती करण्यात न आल्याने नाटय़गृहाची मोठी दुरवस्था झाली होती. त्यामुळे या नाटय़गृहाच्या नूतनीकरणासाठी ११ मार्च १०१९ पासून ते बंद आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नाटय़रसिकांची गैरसोय सुरू होती. त्यांना पर्याय म्हणून मुंबई किंवा ठाणे येथे जावे लागत होते. त्यामुळे लवकरात लवकर काम संपवून नाटय़गृह सुरू करावे अशी मागणी होत होती.

११.५० कोटी रुपये खर्चातून नाटय़गृहाचे ‘मेकओव्हर’चे काम सुरू होते. नोव्हेंबपर्यंत या कामाची मुदत देण्यात आली होती. दरम्यान पालिका आयुक्तांनी पाहणी केली असता, आणखी काही कामाची आवश्यकता असल्याने या कामात २.५० कोटींचे काम वाढविण्यात आले होते. त्यामुळे दिलेल्या मुदतीत काम झाले नाही. आता वाढीव कामही अंतिम टप्प्यात आहे. नववर्षांच्या स्वागतालाच १ जानेवारीपासून नाटय़गृह पुन्हा सुरू होणार असल्याचे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

आरक्षण सोडत?

भावे नाटय़गृह हे मागील अनेक निवडणुकांमध्ये मध्यवर्ती ठिकाण राहिले आहे. राजकीय मेळावे, आरक्षण सोडत या ठिकाणी झाली आहे. एप्रिलमध्ये पालिका निवडणूक होत असून प्रभागांच्या आरक्षणाची सोडतही कायापालट झालेल्या या नाटय़गृहातच होणार आहे.