• नवी मुंबई, पनवेल, उरणमधील जनजीवन विस्कळीत
  • सकाळच्या शाळा सुरळीत, मात्र दुपारच्या सत्रात बंद
  • आंदोलनकर्त्यांकडून ठिकठिकाणी बसगाडय़ांची मोडतोड

भीमा-कोरेगाव येथे जमावावर करण्यात आलेल्या दगडफेकीविरोधात दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे बुधवारी नवी मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका बसल्यामुळे अनेकांची रखडपट्टी झाली. शहरातील जवळपास सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. सकाळच्या सत्रातील शाळा सुरू होत्या, मात्र वाहतुकीच्या साधनांअभावी बहुतेक विद्यार्थी अनुपस्थित होते, तर दुपारच्या सत्रातील शाळांना मात्र सुट्टी देण्यात आली होती.

राज्यभरातील शाळा सुरू राहणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केल्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळा भरल्या, मात्र रिक्षा व बस बंद असल्यामुळे बहुतेक विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नाहीत. दुपारच्या सत्रातील शाळा मात्र बंद ठेवण्यात आल्या.