18 January 2019

News Flash

आगरी कोळी समाजासाठी ‘भूमिपूत्र भवन’

वर्षअखेपर्यंत बांधकाम पूर्ण

उलव्यात ८२.७३ कोटी खर्चून उभारणार वास्तू; वर्षअखेपर्यंत बांधकाम पूर्ण

ठाणे जिल्हय़ातील आगरी कोळी समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी आणि सांस्कृतिक उपक्रम व प्रदर्शनांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सात वर्षांपूर्वी सिडकोने नेरुळमध्ये आगरी कोळी संस्कृती भवन साकारले. तर झपाटय़ाने विस्तारित होत असलेल्या रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी समाजासाठी देखणे असे भूमिपुत्र भवन उलवे नोडमध्ये नव्या वर्षांत आकारास येणार आहे.

नवी मुंबई तसेच ठाणे बेलापूर पट्टय़ात, रायगड जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात आगरी कोळी समाज राहतो. शहर वसविण्यासाठी सिडकोने शेतकऱ्यांच्या शंभर टक्के जमिनी संपादित करून नवी मुंबई शहर उभारले. समाजाच्या संस्कृतीच्या जपणुकीसाठी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवनाप्रमाणे उलवे नोडमध्ये उलवे सेक्टर १९ ए येथील भूखंड क्रमांक आठवर भूमिपुत्र भवन नव्या वर्षांत आकारास येणार आहे.

या भवनामध्ये दोन मजली तळघर, वाहनतळ, स्वयंपाकघर, प्रसाधनगृह,  बहुउद्देशीय सभागृह, प्रेक्षागृह तसेच प्रकल्पग्रस्तांच्या तरुण पिढीसाठी व त्यांच्या विकासासाठी प्रशिक्षण व विमानचालन अकादमी निर्माण केली जाणार आहे. मूळ मासेमारी व शेती या पारंपरिक व्यवसायाचे रूपांतर शहरी व्यवसायांमध्ये होत असल्याने या भवनामध्ये प्राचीन समृद्ध संस्कृती व परंपरांचे जतन करण्यास सहकार्य तर होईलच, त्याशिवाय या विभागातील समाजाला विविध व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भवनाचा चांगला उपयोग होणार आहे.

नव्याने विकसित होत असलेल्या व झपाटय़ाने कामाची गती घेतलेल्या नेरुळ खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गावरील बामणडोंगरी रेल्वेस्थानकाच्या लगतच्या बाजूलाच उलवे सेक्टर १९ मध्ये सिडकोच्या उन्नती गृहप्रकल्पासमोरच भवनाची निर्मिती होत आहे. १३ जून २०१६मध्येच या कामाला सुरवात झाली असून नव्या वर्षांअखेरीपर्यंत कामाची मुदत देण्यात आल्याची माहिती सिडकोतर्फे देण्यात आली आहे. नवी मुंबई ही मूळ आगरी कोळ्यांची वस्ती. सिडकोने १९७० मध्ये नवी मुंबई शहराची निर्मिती केली. तर एक स्वयंपूर्ण आणि सर्वसमावेशक शहर निर्माण करण्याचा प्रयत्न स्थापनेपासूनच सिडकोकडून केला जात आहे.

असे असणार भूमिपुत्र भवन

  • ठिकाण: उलवे सेक्टर १९ए, भूखंड क्र.८, क्षेत्रफळ-५६०० चौ.मी. ठेकेदार मे. एविआ कन्स्ट्रक्शन प्रा. लि.
  • पार्किंगसाठी तळमजले, १००० आसन क्षमतेचे सभागृंह, १००० आसनक्षमतेचे प्रेक्षागृह, तिसऱ्या मजल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी प्रशिक्षण व विमानचालक अकादमी.

नरायगड जिल्ह्य़ातील समाजबांधवासाठी मानबिंदू ठरणाऱ्या भवनाचा प्रस्ताव  माझ्या कार्यकाळातच या भवनाचा प्रस्ताव मंजूर झाला. हे भवन आगरी कोळी बांधवांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे.  – नामदेव भगत, नगरसेवक व माजी सिडको  संचालक

नवी मुंबई व रायगड जिल्हय़ातील आगरी कोळी समाजाच्या मोठय़ा त्यागावर ही टोलजंग शहरे निर्माण झाली आहेत.सिडको उभारत असलेले भूमिपुत्र भवन  आगरी कोळी समाजाच्या संस्कृती व संर्वधनाचे केंद्र ठरणार आहे.         – प्रशांत ठाकूर , आमदार, भाजप

सिडकोने उलवे येथे भूमिपुत्र भवनाच्या निर्मितीला १३ जून २०१६ मध्येच सुरवात केली आहे. भवनाचे काम वेगाने सुरु असून यंदाच्या वर्षांअखेरीस या भवनाची वास्तू पूर्ण होणार आहे.  येथील समाजाच्या सांस्कृतीक ठेवा ठरणारी वास्तू देखण्या व विस्तृत स्वरुपात उभारली जात आहे.      – के.डी.जाधव, कार्यकारी, अभियंता सिडको

First Published on January 2, 2018 1:41 am

Web Title: bhumiputra bhawan for koli samaj