एका मित्राची दुचाकी दुसऱ्या परिसरात जाऊन विकणे, बीड जिल्ह्य़ातील विश्रामगृहात जाऊन स्वत: आमदार असल्याचे सांगून सरकारी मेजवानीवर ताव मारणे, मुंबईत व्यापारी असल्याचे सांगूून त्याची लाखो रुपयांची फसवणूक करणे अशा विविध गुन्ह्य़ात हवा असलेला संशयित आरोपी सचिन परदेशी (३८) याला पनवेल शहर पोलिसांनी सावंतवाडी येथून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या १८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सचिन हा पाच वर्षांपासून विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ांमध्ये पोलिसांना हवा होता.
पनवेल शहरामध्ये परदेशी आळीमध्ये सचिन आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याचे वडील सरकारी सेवेत आहेत. सचिनच्या रोजच्या चोऱ्यांच्या उपद्रवामुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले. मित्रांच्या दुचाकी चोरणे व इतरांना विकणे मिळालेल्या पैशांमध्ये चैनीचे जीवनमान जगणे हा सचिनचा नित्यक्रम होता.
बीड जिल्ह्य़ातील सरकारी विश्रामगृहात स्वत:ला आमदार असल्याचे भासवून तेथील विश्रामगृहातील सेवेचा भरपूर आनंद घेतल्यावर तेथील विश्रामगृह नियंत्रकांना सचिनचा संशय आल्याने त्याच्या विरोधात बनावट आमदार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्हापूर येथील एका सराफाला असेच फसवण्यात सचिनला यश आले. एक कोटी रुपयांचे सोने देतो असे आमिष देऊन या सचिनने सराफाकडून आगाऊ रक्कम म्हणून चार लाख रुपये उकळले. तेथूनही तो फरार झाला. अनेक जिल्ह्य़ातील पोलीस सचिनला पकडण्यासाठी पनवेलमध्ये येत असत मात्र सचिन पनवेलमधून दुचाकी चोरून त्या इतर ठिकाणी विकत असे.
मागील वर्षी पनवेल शहरातील दुचाकीचोरींच्या आकडेवारीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी सचिनला शोधून काढण्यासाठी वेगळे पथक निर्माण केले होते. या पथकाने सचिनचा मोबाइल क्रमांक मिळविला. सचिन वेळोवेळी मोबाईल फोन आणि सीमकार्ड बदलत असे. मात्र मागील गेल्या महिन्यात त्याने एकाशी बोलताना सावंतवाडीचा केलेल्या उच्चारामुळे पनवेल शहर पोलिसांनी सावंतवाडी येथील एका लॉजवर आपले बस्तान मांडून सचिनला पकडले. ५० हजारांची दुचाकी सचिन विनाकागदपत्रात १० ते १५ हजार रुपयांना विकत होता. व्यवहारात कोणताही संशय येणार नाही, याची तो खबरदारी घेत असे.