* विघ्नहर्ता स्पर्धा २०१४
* नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत मागील वर्षी उरण व पनवेल तालुक्यांतील परिमंडळ २चा ‘विघ्नहर्ता’ स्पर्धेचा निकाल शुक्रवारी पनवेल शहरातील फडके नाटय़गृहामध्ये जाहीर करण्यात आला. २०१४ विघ्नहर्ताच्या प्रथम पारितोषिकाचे मानकरी कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर आणि पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते या पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. दोनशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पाहणी केल्यानंतर परीक्षकांनी हा निर्णय घेतला. द्वितीय पारितोषिक पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटीमधील कांतिलाल प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव आणि तृतीय पारितोषिक कामोठे येथील कामोठे मानसरोवर कला क्रीडा संस्थेला मिळाले.
गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना काटेकोर नियम पाळत धार्मिक भावना जपून सामाजिक संदेश देणारे देखावे उभे केले. तसेच भाविकांसाठी सुरक्षेच्या उपाययोजनांना महत्त्व देत आयोजन केल्यामुळे हा पुरस्कार विजेत्या मंडळांना मिळाल्याचे सहायक पोलीस आयुक्त एस. बी. सूर्यवंशी यांनी जाहीर केले. दर वेळी ही स्पर्धा संपूर्ण नवी मुंबईसाठी घेतली जात होती. मात्र यंदा ही स्पर्धा पनवेल व उरणसाठी स्वतंत्र राबविली गेली. अनुपमा ताकमोघे यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निवेदन केले. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या परिसरातील उत्तम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वेळी गौरविण्यात आले. त्यामध्ये पनवेल शहरातील मीरची गल्ली येथील स्वराज मंडळ, खांदेश्वर वसाहतीमधील ओमसाई खांदेश्वर मित्र मंडळ, कामोठे येथील सेक्टर ३४ मधील श्री गणेश मित्र मंडळ, खारघरमधील सेक्टर १९ येथील सिद्धिविनायक मंडळ, उरण शहरातील बुरूड आळी येथील राजेशिवाजी मंडळ, कळंबोली येथील राजे शिवाजीनगर रहिवासी संघ, तळोजा येथील रोहींजन गावातील जय दुर्गा मंडळांना गौरविण्यात आले.
उत्तम नियोजनामध्ये विसर्जन मिरवणुका काढणाऱ्यांपैकी प्रथम पारितोषिक पनवेल शहरातील पायोनियर परिसरातील अभिनव युवक मित्र मंडळ आणि द्वितीय पारितोषिक उरण शहरातील स्वामी विवेकानंद चौकामधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आले. मागील वर्षी हेच पारितोषिक पनवेल शहरातील बल्लाळेश्वर मंदिर येथील सन्मित्र मंडळाला देण्यात आले होते.
यंदा या मंडळाला आदर्श मंडळ हा वेगळा पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण पनवेल शहरातील शदर रानडे, मनोहर लिमये, कामोठे येथील रणजीत सोनी, कळंबोली येथील इकबाल इनामदार (प्राचार्य), खांदेश्वर येथील सुरेंद्र बोंद्रे (वकील), उरण येथील श्रीमती गौरी देशपांडे, खारघर येथील जसविंदरसिंग सैनी यांनी केले आहे.