11 July 2020

News Flash

पालिकेच्या सर्व शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी, डिजिटल वर्ग  

महापालिकेच्या काही शाळांमध्ये बायोमेट्रीक हजेरीचे आणि डिजिटल वर्गखोल्यांचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही.

वर्ग शंभर टक्के कार्यान्वित करण्यावर प्रशासनाचा भर

महापालिकेच्या काही शाळांमध्ये बायोमेट्रीक हजेरीचे आणि डिजिटल वर्गखोल्यांचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच्या दुसऱ्या सत्रात हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी हा प्रकल्प महापालिका शाळांमध्ये सुरू  केला होता. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मात्र  दरवर्षी वाढत आहे.  पालिकाक्षेत्रात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. यात मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. या सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या शालान्त परीक्षेचा निकालही चांगला लागत आहे. पालिका शिक्षण विभागाअंतर्गत ५३ प्राथमिक शाळा  आणि १९ माध्यमिक शाळा आहेत. तसेच कोपरखैरणे आणि सीवूडस येथे  दोन सीबीएसई शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता या सर्वच शाळांमध्ये डिजिटल सुविधा सुरू  करण्यात आली आहे. परंतु काही शाळांमध्ये याबाबतची दहा टक्के कामे अद्याप शिल्लक आहेत. यात काही ठिकाणी तांत्रिक अडचणींचा सामाना करावा लागत आहे.

डिजिटल शिक्षण यंत्रणा  ‘माइन्ड टेक’ या कंपनीकडून डिजिटल शाळांचा उपक्रम राबविला जात आहे. महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्वच ६०० वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. यात प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर आणि  डिजिटल बोर्ड बसविण्यात आले आहेत. ईआरपी यंत्रणा राबविण्यात आली आहे.  प्रत्येक मूल वर्गात  प्रवेश केल्यानंतर त्याची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंद होणार आहे. मूल शाळेत आल्यानंतर त्याची नोंद होताच त्याच्या पालकांना ‘एसएमएस’द्वारे माहिती दिली जाणार आहे.

परंतु शाळांमध्ये शिक्षकांच्या वर्गातील बायोमेट्रीक हजेरीला काही ठिकाणी सुरवात झाली आहे.  काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ईआरपी यंत्रणेत विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती अद्याप अंतर्भूत करण्यात आलेली नाही. त्यामुळे  विद्यार्थ्यांची  बायोमेट्रीक हजेरी सुरू  करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाइल क्रमांक  सातत्याने बदलत असल्याने या प्रक्रियेत अडचण निर्माण होत आहे.

पाच वर्षांच्या कालावधीत  अभ्यासक्रम बदलला तर त्याचे  रुपांतर डिजिटलमध्ये करून देण्याचा मुद्दा निविदेत आहे. त्यामुळे यंदा बदललेला दुसरीचा अभ्यास अद्याप या प्रक्रियेत आलेला नाही. याबाबत पालिका आयुक्त आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारासोबत बैठक घेऊन उर्वरित कामे करण्याचे आदेश दिले आहेत.  दिवाळी सुट्टीनंतर  ११ नोव्हेंबरला महापालिका शाळांचे दुसरे सत्र सुरू झाले आहे. कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डिजिटल वर्ग आणि बायोमेट्रीक हजेरीबाबत माहिती घेतली आहे.  संबंधित ठेकेदाराला निविदेत असलेल्या व अपूर्ण असलेल्या गोष्टी १०० टक्के पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदाराला डिजिटल वर्गखोल्या आणि बायोमेट्रीक हजेरीची कामे पूर्ण करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. -अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई पालिका 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 12:51 am

Web Title: biometric attendance digital classes municipal schools akp 94
Next Stories
1 उरण फाटा-तुर्भे रस्त्याच्या काँक्रीटीकरणास लवकरच सुरुवात
2 आर्थिक मंदीतही गुंतवणुकीचा मार्ग कसा नि कुठे?
3 किरकोळ बाजारात कांदा ८० रुपयांवर
Just Now!
X