उरणच्या खाडीकिनाऱ्यावर असलेल्या पाणजे परिसरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनच हजारो मैलांचा प्रवास करीत हवामान बदलासाठी रोहित पक्ष्यांसारखे परदेशी पाहुणे येतात. याशिवाय देशी जातीच्या हजारो पक्ष्यांचेही उरण हे आश्रयस्थान बनले असताना या परिसरात सुरू असलेल्या खाडीतील मातीच्या भरावामुळे तसेच उद्योगनिर्मितीमुळे या पक्ष्यांची मूळ स्थाने व पाणथळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या संदर्भात पक्षिप्रेमी संघटनांनी उरणमधील पाणथळे संरक्षित करण्याचीही मागणी केंद्र सरकारकडे अनेकदा केली आहे. या मागणीचा विचार करून येत्या काळात उरण वन विभागाकडून येथील स्थाने व पाणथळे संरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती उरणच्या वन विभागाने दिली आहे.
सैबेरिया, तजाकिस्तान तसेच इतर देशांतून विविध जातींचे पक्षी दरवर्षी भारतातील विविध ठिकाणी येतात. यापैकी अनेक पक्ष्यांचे उरण परिसरात वास्तव्य असते. उरणमध्ये असलेल्या खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीत पक्ष्यांचे मुख्य खाद्य असलेले मासे, किडे, विविध जातींचे खेकडे मोठय़ा प्रमाणावर आहेत. मात्र या परिसरात सुरू असलेल्या मातीच्या भरावामुळे खाडीचा भाग कमी होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे येथील पक्ष्यांची खाद्य निर्माण करणारी खारफुटीही नष्ट होऊ लागली आहे. खाद्य कमी होत असल्याने खाडीकिनाऱ्यावरील पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. पाणजे गावाला लागून अरबी समुद्र असल्याने येथील किनाऱ्यांवर दरवर्षी हजारो पक्षी येत आहेत. चार वर्षांपूर्वी याच परिसरात परदेशी रोहितची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. या परिसरात असलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांमुळेही पक्ष्यांना अपघात होऊन पक्षी जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली आहे. यावर उपाय म्हणून वन विभागाने सुरक्षा यंत्रणा उभारली आहे. मात्र या परिसरात होणाऱ्या भरावामुळे येथील पाणथळेच नष्ट झाल्यास पक्ष्यांची स्थानेही नष्ट होणार आहेत. ती टिकविण्याची व त्यांना संरक्षण देण्याची मागणी पक्षिप्रेमींनी केली आहे. याची दखल घेत उरणमधील विविध जातींच्या पक्ष्यांचे सरंक्षण करून त्यांची मूळ स्थाने टिकवून ठेवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे उरण वन विभागाचे वनपाल सी. यू. मराठे यांनी सांगितले. याकरिता पाणजे तसेच दास्तान फाटा येथे सर्वाधिक पक्षी येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळ पडल्यास या जमिनी संपादित करण्याचीही तयारी असून तशी तरतूद असल्याचेही ते म्हणाल.े