नवी मुंबई : १११ नगरसेवकांच्या नवी मुंबई पालिका सभागृहात तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच केवळ सहा नगरसेवक निवडून आलेल्या भाजपचे आज याच भागात दोन आमदार झाले आहेत. नवी मुंबईतील कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांना भाजपने विधान परिषदेत संधी दिली आहे, तर माथाडी नेते व राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. विधान परिषदेच्या प्रतीक्षा यादीत नरेंद्र पाटील यांचे नाव असल्याने राष्ट्रवादीने त्यांच्या आमदारकीवर काट मारली आहे. पाटील आता ऐरोली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होण्याची शक्यता आहे.

दहा वर्षांपूर्वी नवी मुंबईत भाजपचा कार्यकर्ता शोधून सापडणे शक्य नव्हते. एप्रिल २०१५च्या पालिका निवडणुकीत या पक्षाचे पहिल्यांदाच सहा नगरसेवक निवडून आले. त्यापूर्वी बेलापूरमध्ये या पक्षाने थेट आमदारकीने खाते उघडले होते. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीमधून उडी मारून मंदा म्हात्रे भाजपमध्ये डेरेदाखल झाल्या आणि आमदारही झाल्या. पक्षाला त्यामुळे संजीवनी मिळू लागली. लोकसभा निवडणुकीत या पक्षाचा केंद्रातील मित्रपक्ष आपना दलचे खासदार हरिबंस सिंहदेखील उत्तर प्रदेशमधून खासदार झाले. त्यापूर्वी त्यांनी याच भागातून आमदारकी व खासदारीकीची निवडणूक लढविली होती. २४ वर्षांनंतर त्यांना आपल्या जन्मगावात यश मिळाले. ते नवी मुंबईत भाजपला मदत करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

कोळी संघटनेची नवी मुंबईत स्थापना करून संपूर्ण राज्यात विस्तार करणारे तळवळी गावातील उद्योजक रमेश पाटील यांना भाजपने विधान परिषदेत संधी दिली आहे. त्यांच्या विजयाची आता केवळ औपचारिकता बाकी आहे. कोळी समाज ठाणे, रायगडमध्ये सर्वाधिक असला तरी राज्यात या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत या कोळी संघटनेने भाजपला ७८ मतदारसंघांत मदतीचा हात दिला होता. त्या मदतीची परतफेड म्हणून भाजपने पाटील यांना विधान परिषद दिल्याची चर्चा आहे. पाटील ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते, पण त्यांना विधान परिषदेत संधी देऊन भाजपने संपूर्ण राज्यात कार्य करण्याची संधी दिली आहे. पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या ऐरोली मतदारसंघात भाजपला आमदार मिळाला आहे.

माथाडी कामगार नेते व राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असून येत्या काळात त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यांनी डावखरे यांचा जाहीर सत्कार ठेवला असून त्याच्या जाहिरतीच्या फलकावर भाजपच्या नेत्यांची छायचित्रे आहेत. पाटील यांना विद्यमान ११ विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार होती. आगामी विधानसभा निवडणुकीत ऐरोलीतून पाटील यांना तर पाटण मतदारसंघातून त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यांच्या प्रवेशाने भाजपचा माथाडी संघटनेत शिरकाव होणार आहे.