मुंबई पालिका निवडणुकीपासून चार हात लांब ठेवण्यात आलेल्या आमदार आशीष शेलार यांना भाजपाने कोणत्याही क्षणी होणाऱ्या नवी मुबंई पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी शेलार यांच्यावर गुजरात, कर्नाटक आणि हैद्राबाद पालिका निवडणुकीत सहप्रभारी म्हणून जबाबदारी होती.

पक्षाचे स्थानिक नेते व आमदार गणेश नाईक यांनी तीन पक्षांच्या माध्यमातून आतापर्यंत पालिकेवर २५ वर्षे सत्ता कायम ठेवली होती, मात्र त्यांनी कधीही या पक्षातील नेत्यांची मदत घेतलेली नाही. त्यामुळे पक्षशिस्तीप्रमाणे भाजपाचे अनेक नेते नवी मुंबई पालिका निवडणुकीत हस्तक्षेप करणार आहेत.

करोनाच्या प्रार्दुभावामुळे गेल्या वर्षी अनिश्चित काळासाठी स्थागित झालेली नवी मुंबई पालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली असून महाविकास आघाडीचे संयुक्त कार्यक्रम व बैठका सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी दोन दिवसापूर्वी एपीएमसी घाऊक बाजारपेठेत भल्या पहाटे फेरफटका मारलेला आहे. नाईकांच्या हातून सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीने सर्व तयारी केली असून सर्व पवार कुटुंबीय या निवडणुकीत उतरणार आहे.

महाविकास आघाडीच्या या संघटित व्यहूरचनेची सामना करण्यासाठी भाजपाने नवी मुंबईत असलेल्या अठरापगड जातीच्या मतदारांसाठी पक्षातील त्या-त्या जातीचे नेते उतरविण्याची तयारी

सुरू केली आहे. या सर्व निवडणकीची तयारी करण्यासाठी आमदार आशीष शेलार यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली असून नाईक कुटुंबीयाला भाजपाची सर्व यंत्रणा मदत करणार आहे.

नवी मुंबईत आमदार मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांच्यातून विस्तव जात नाही. एका पक्षाचे आमदार असूनही शह काटशह राजकारण सरू आहे. त्यांना एकत्र घेऊन पालिका निवडणुकीत समन्वय साधण्याची मोठी कसरत शेलार यांना करावी लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील व शहरातील इतर पदाधिकारी होते. नाईक कुटुंबातील माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनाही पक्षात कोणतेही महत्त्वाचे पद नसताना बैठकीत स्थान देण्यात आले होते.