लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : करोनाकाळात र्निबध असताना कार्यकर्त्यांना वाढदिवसाची पार्टी दिल्याप्रकरणी खारघर येथील भाजपचे नगरसेवक नीलेश बाविस्कर यांच्या विरोधात रविवारी मध्यरात्री पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यापूर्वी भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांच्यावरही अशाच पद्धतीची कारवाई करण्यात आली होती.

भाजपच्या नगरसेविका लीना गरड यांच्या विरोधातही ‘रावन दहन’ केल्याप्रकरणी करावाईचे आदेश पोलीस आयुक्त बिपिनकुमार यांनी दिले होते.

नगसेवक नीलेश बाविस्कर यांच्या वाढदिवसाची पार्टी सेक्टर १८  मधील हरिओमधाम या इमारतीजवळ सुरू होती. रविवारी रात्री पावणेदहा वाजता पहिल्या मजल्यावर नगरसेवक बाविस्कर यांच्या खास व निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी जेवणाच्या पार्टीचे आयोजन केले होते. १५ ते २० जण पहिल्या मजल्यावर आणि कार्यालयाबाहेर १० ते १५ जण जमले होते. या ठिकाणी वाढदिवसाच्या पार्टीच्या जेवणाचे नियोजन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन पोलीस शिपाई घटनास्थळी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या पार्टीसाठी पोलीस किंवा पनवेल पालिकेच्या परवानगीविषयी विचारणा केल्यानंतर कोणतीही कागदपत्रे नगरसेवक बाविस्कर व त्यांचे कार्यकर्ते दाखवू शकले नाहीत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बजावलेल्या टाळेबंदीच्या अटीशर्तीचा भंग केल्यामुळे कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.

पालिका सदस्यांवर पोलीस विभागाने स्वत:हून नियमांचा भंग झाल्यामुळे कारवाई केली आहे. पालिकेसह स्वत: मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्र्यांनीही स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. वाढदिवस पुढील वर्षीही साजरा करता येऊ  शकतो असे मला वाटते.
– सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका