प्रशासनाचा ठराव फेटाळून सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी

पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर आपल्या पक्षाचेच वर्चस्व ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपने प्रशासनाचा ठराव फेटाळून प्रभाग समिती कार्यक्षेत्राबाबतचा सुधारित प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. त्यामुळे शेकाप महाआघाडीच्या वाटय़ाला एकही प्रभाग समिती येणार नसून चारही समित्या भाजपच्या ताब्यात राहणार आहेत.

नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करताना जे घडले त्याचीच पुनरावृत्ती पनवेल पालिकेच्या सभागृहात गुरुवारी प्रभाग समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करताना घडली. नवी मुंबई पालिकेच्या सभागृहात सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची होती, तर पनवेल पालिकेमध्ये सत्ता भाजपची आहे. नवी मुंबई पालिकेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी दिलेला सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी नामंजूर केला, तर भाजपची सत्ता असताना प्रभाग समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करताना मुख्यमंत्री कोणता निकष लावतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पनवेल महापालिकेच्या प्रभाग समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याचा प्रस्ताव गुरुवारी महासभेसमोर मांडण्यात आला. प्रभागांच्या क्रमवारीनुसार पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव आणला होता. परंतु, सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर तो प्रस्ताव फेटाळून बहुमताच्या जोरावर सर्व प्रभाग समित्या भाजपकडेलावला. सर्वसामान्य जनतेला समितीच्या कार्यालयात पोहचण्यासाठी होणाऱ्या त्रासाची समस्या मांडत नवीन समितीचे कार्यक्षेत्र ठरवून नवीन प्रस्ताव भाजपचे पालिकेतील गटनेते परेश ठाकूर यांनी सभागृहासमोर ठेवला. सभागृहातील भाजपच्या सदस्यांनी या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी दिली. शेकाप महाआघाडीच्या सदस्यांनी गटनेते ठाकूर यांनी मांडलेला ठराव नियमबाह्य़ असल्याची ओरड केली. मात्र ४९ भाजप सदस्यांसमोर शेकाप महाआघाडीच्या सदस्यांचा आवाज फिका पडला. हात उंचावून भाजपच्या सदस्यांनी हा ठराव मंजूर केला. नवीन प्रभाग समिती कार्यक्षेत्रांमुळेही नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडावाच लागेल, तसेच एका वसाहतीतून दुसऱ्या वसाहतीमधील प्रभाग समितीच्या कार्यालयात जाण्याची वेळ नागरिकांवर येईल, असे सांगत महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनीही या प्रस्तावाबद्दल आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला. आयुक्त शिंदे यांनी आपल्या निवेदनात प्रशासनाची भूमिका मांडताना लोकशाहीच्या अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या पराभावाचा दाखला सभागृहासमोर ठेवला. प्रभाग समितीच्या रचनेमध्ये बदल केल्यामुळे लोकसंख्येच्या समानहक्कावर गदा आली आहे. दोन प्रभाग समितींमधील नगरसेवकांची संख्या वाढली तर दोन प्रभाग समितींमधील नगरसेवकांची संख्या कमी झाली. यामुळे विकासकामांवर परिणाम होऊ शकेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. परंतु, तरीही सत्ताधाऱ्यांना हा ठराव बहुमताने मंजूर केला. भाजपच्या या खेळीमुळे पनवेलमधील चारही प्रभाग समित्या सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात राहणार आहेत.  शेकाप महाआघाडीच्या सदस्यांनी या ठरावाविरोधात मुख्यमंत्री व न्यायालयात जाणार असल्याचे शेकाप महाआघाडीचे गटनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.

[jwplayer 8ychZcQY]

भाजपचेच वर्चस्व

प्रभाग समिती ‘अ’ मध्ये १ ते सहा प्रभाग येत आहेत. त्यात १३ भाजपचे तर ११ शेकाप महाआघाडीचे सदस्य आहेत. ‘ब’ समितीमध्ये भाजपचे १४ तर शेकापमहाआघाडीचे १० सदस्य आहेत. प्रभाग समिती ‘क’ मध्ये कामोठे येथील ११ ते १३ आणि पनवेल शहरातील बंदर रोड साईनगर एमजी रोडचा परिसर असलेला प्रभाग क्रमांक १४ हा परिसर जोडला आहे. यामध्ये भाजपचे १२ सदस्य आहेत. तर शेकाप महाआघाडीचे ३ सदस्य आहेत. अखेरच्या प्रभाग समिती ‘ड’ मध्ये १७ ते २० अशा प्रभाग क्रमांकाचा सलग समावेश आहे. यामध्ये भाजपचे १२ सदस्य तर शेकाप महाआघाडीचे ३ सदस्य आहेत.

नवख्या सदस्यांना शिकण्यासाठी वेळ लागेल..

नाटय़गृहाच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेले भाजपचे स्थानिक नेते जयंत पगडे, अरुण पाटील हे हातवारे करून सत्ताबाकांवरील मंडळींना सूचना करीत होते. याच वेळेत नवख्या सदस्यांना शिकण्यासाठी अजून दोन वर्षे लागतील, अशी हाक प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेल्यांनी मारली. सदस्य जगदीश गायकवाड यांना बोलताना माईक दिला नाही म्हणून एकाने प्रेक्षक गॅलरीतून पालिकेच्या कर्मचाऱ्याला माईक जाऊन देण्याची मोठी हाक मारली. अशा वातावरणात महासभा पार पडली.

पहिली महासभा आणि गोंधळाचा अंक

नाटय़गृहातील पहिली महासभा असल्यामुळे वन्दे मातरमच्या राष्ट्रगानात सदस्यांचा एकसूर पाहायला मिळाला नाही. त्यामुळे यापुढे राष्ट्रगानाचे विडंबन होऊ नये यासाठी रेकॉर्ड राष्ट्रगान वाजवन ते म्हणू या असे आज एकमुखाने सभागृहातील सदस्यांनी ठरवले. महापौर व सदस्यांना सभागृह नवीन असले तरी यापूर्वीच्या नगर परिषदेत, पंचायत समितीत व जिल्हा परिषदेत काम केलेल्या सदस्यांनी महापौरांनी कामकाज सुरू करण्याचे निवेदन केल्यावर पहिल्यांदा दुखवटा व अभिनंदनांचा ठराव घेण्यासाठी शेकाप महाआघाडीच्या सदस्यांनी गोंधळ घातला. पहिल्याच सभेत पहिला कोणाचा आवाज याविषयीची चढाओढ सभागृहात पाहायला मिळाली.