पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ सदस्यांपैकी भाजपचा एकही सदस्य निवडून आला नाही. भाजप विरुद्ध शेकाप आणि मित्रपक्षाच्या महाआघाडीच्या या अटीतटीच्या निवडणुकीत समितीवर १५ सदस्य निवडून आल्याने शेकापचे वर्चस्व कायम राहिले आहे. शेकापचे सहकारी पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आले. भाजपचा सामना करण्यासाठी शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा चार प्रमुख पक्षांनी महाआघाडी स्थापन केली होती.

मुंबई, ठाण्यानंतर पनवेलची बाजार समिती एमएमआरडीए भागात महत्त्वाची मानली जाते. या समितीची पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी झालेल्या मतमोजणीत ग्रामपंचायत, माथाडी आणि व्यापारी सदस्य निवडणुकीत सातपैकी एकही सदस्यपद भाजपला राखता आले नाही. या सातही जागांपैकी पाच जागांवर शेकापने वर्चस्व कायम ठेवले तर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी एक सदस्यपदावर वर्णी लावली. या १८ सदस्यांपैकी सोसायटी सदस्यांच्या दहा सदस्यांची बिनविरोध निवड यापूर्वीच झाली आहे. एक सदस्यपद भटक्या विमुक्त महिला सदस्यासाठी राखीव असल्याने त्याची निवड नंतर होणार आहे. ही निवडही शेकापच्या ताब्यातील आहे. त्यामुळे १८ पैकी ११ सदस्यपदे शेकापने यापूर्वीच खिशात घातली होती. रविवारी झालेल्या निवडणुकीत मात्र भाजपला महाआघाडीने धोबीपछाड दिला. त्यामुळे या प्रमुख पक्षाला एकही पदावर विजय मिळविता आला नाही. भाजपला या निवडणुकीत चारी मुंडय़ा चित करण्यासाठी शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी युती झाली होती.

गेली ६० वर्षे ही बाजार समिती शेकापच्या ताब्यात असून येथील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये यासाठी ही महाआघाडी करण्यात आली होती असे भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आले.

दगडफेक

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील मतमोजणी सरस्वती विद्यानगरी येथे सुरू असताना सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांसमोर दगडफेक आणि हाणामारी झाली. शेकाप आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष एकमेकांसमोर ठाकल्याने भाजपचे गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत हे दगडफेकीत जखमी झाले. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. रात्री उशिरापर्यंत पोलीस तक्रार नोंदण्याचे काम सुरू होते.