News Flash

भाजप-मनसेचा श्रीगणेशा नवी मुंबईतून?

पालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याच्या हालचाली

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : राज्यात नुकत्याच शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता नवी मुंबई व औरंगाबाद पालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारविरोधातील अनेक आंदोलनांत भाजप व मनसेत समंजसपणा सुरू झाल्याने राज्यात या दोन पक्षांत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याची सुरुवात नवी मुंबई व औरंगाबाद पालिका निवडणुकांपासून करण्याची तयारी सुरू करण्यात येत आहे. नवी मुंबईत मनसेने २० प्रभागात दावा केला असून भाजप दहा ते बारा प्रभाग देण्यास तयार असल्याचे समजते.

करोना साथरोगामुळे नवी मुंबई पालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मे महिन्यात १११ नगरसेवकांची मुदत संपली असून त्यांच्या जागी पालिका आयुक्तांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांना या महिन्यात पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या सहा महिन्यांत राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी जनगणना कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याने सर्व निवडणुका २०११ च्या जणगणनेनुसार लवकरात लवकर घेतल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने राज्यातील सर्व पालिका, नगरपािलका आणि पंचायत निवडणुका घेण्यात याव्यात, असा अहवाल राज्य गुप्तचर विभागाने सरकारला दिला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत नवी मुंबई पालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता असून युती, आघाडीचे वारे वाहू लागले आहेत.

यात राज्यात समान आंदोलन कार्यक्रमावर मनोमीलन झालेल्या भाजप व मनसे या दोन पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी भाजप प्रवेश करून आमदारकी टिकवली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत असताना नाईक हे शहरातील सर्व राजकीय निर्णय घेत होते, मात्र भाजपमध्ये ती पद्धत नसून सर्व निर्णय राज्य कार्यकारिणी घेणार आहे. मनसे व भाजप युती संदर्भात राज्यात चर्चा सुरू असून मनसेने नवी मुंबईत १११ पैकी २० प्रभागांची मागणी केली होती. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवून ४० हजार मतांची बिदागी पदरात पाडून घेतली होती. त्यामुळे मनसे २० प्रभागात दावा करीत असून भाजप केवळ दहा ते बारा प्रभाग देण्यास तयार आहे. या निवडणुकीत ही युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप-मनसे युतीचे कोणतेही संकेत आमच्यापर्यंत देण्यात आलेले नाहीत, पण कामाला लागण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अनेक प्रभागांची तयारी करण्यात येत असून मनसेने यावेळी विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी मते घेतलेली आहेत. त्या दृष्टीने या निवडणुकीत मनसे खाते खोलणार आहे.

-गजानन काळे, अध्यक्ष, मनसे, नवी मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:02 am

Web Title: bjp mns may come together in navi mumbai muncipal corporation elections dd70
Next Stories
1 बारा भूखंडांवरील आरक्षण बदलण्यास भाजपचा विरोध
2 पालिकेच्या कारवाईमुळे मासळी विक्रेते संतप्त
3 विष्णूदास भावे नाटय़गृहाला प्रयोगांची प्रतीक्षा!
Just Now!
X