News Flash

दिशादर्शकांवर भाजपची फलकबाजी

फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या स्वागताचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

भाजप कार्यकर्त्यांनी खारघर परिसरात नियम धाब्यावर बसवून दिशादर्शक फलकांवर  स्वागताचे फलक झळकवले.

मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रवाशांची गैरसोय

‘व्यवस्था ही व्यक्तिसापेक्ष नव्हे, तर निरपेक्ष असावी. अनेकदा व्यवस्था उभी राहते, परंतु अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकारच माहीत नसतात. ज्याला अधिकाराची जाणीव असते तो अधिकारी अल्पावधीतच चांगले कार्य करून दाखवितो,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ग्रामविकास भवनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे त्यातून ध्वनित झाले. मात्र बेकायदा फलकबाजीविरोधात मोहीम उघडणाऱ्या आयुक्त सुधाकर शिंदे यांची कारवाई धाब्यावर बसवत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खारघर परिसरात जोरदार फलकबाजी केली. फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या स्वागताचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

सोमवारी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री खारघरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला येणार असल्याने त्यांचे छायाचित्र असलेले फलक दिशादर्शक फलकांवर लावण्यात आले होते. एकही दिशादर्शक फलक सुटणार नाही, ना अशा पद्धतीने ही फलकबाजी केली. खारघरच्या नागरिकांना सेक्टरची रचना दाखविण्यासाठी हे दिशादर्शक उभारले आहेत. त्यांचाच वापर पंकजा मुंडे यांचे फलक उभारण्यासाठी करण्यात आला. एकीकडे पनवेल महानगरपालिका प्रशासनाचे पथक फलकबाजीविरोधात दंड थोपटून कामाला लागलेले असताना दुसरीकडे मंत्र्यांच्या नावाचे व चेहऱ्यांचे बेकायदा फलक खारघरमध्ये केल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते.

सरकारी नियम हे फक्त विरोधी राजकीय पक्षांना किंवा सर्वसामान्यांना असतात ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांना लागू पडत नाहीत, असेच सोमवारचे दृश्य होते.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा मोर्चाच्या घोषणा

पनवेल : सरकारने खारघरमध्ये ३८ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या ग्रामविकास भवनाचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री भवनाबाहेर पडले असता, मराठा क्रांतीच्या मूक मोर्चेकऱ्यांनी ‘मराठय़ांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशी घोषणाबाजी केली. ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मुख्यमंत्री व पोलिसांना काही समजण्याच्या आत हा प्रकार घडल्यामुळे मुख्यमंत्री हात जोडून, मान हलवत गाडीतून निघून गेले.

आघाडी सरकारने भूमिपूजन करून बांधकाम पूर्ण केलेल्या खारघर येथील सेंट्रल पार्कशेजारच्या ग्रामविकास भवनाचे उद्घाटन युतीच्या सरकारने सोमवारी केले. उद्घाटनाच्या व्यासपीठावर केवळ भारतीय जनता पक्षाचेच मंत्री होते. मुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रकाश मेहता, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगदीश गायकवाड यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. ‘२०१९ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागामध्ये एकही व्यक्ती बेघर राहणार नाही,’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यापुढे राज्यातील खेडी आणि शहरे डिजिटल माध्यमांतून जोडण्यात येतील, असेही ते म्हणाले.

भवनाची रचना

खारघर सेक्टर २१ येथे एक एकर भूखंडावर पाच मजली ग्रामविकास भवन बांधण्यात आले आहे. त्यात ४६० आसनक्षमता असलेले सभागृह, दोन छोटी सभागृहे, एकाच वेळी १०० प्रतिनिधी बसू शकतील असे प्रशिक्षण केंद्र, १२० लोकांचे भोजनगृह, महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून बनविलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ३३ दुकाने आणि ५० वाहनांची पार्किंग व्यवस्था आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 4:17 am

Web Title: bjp poster on indicator board
Next Stories
1 शहरबात- नवी मुंबई :  आहे नियोजनबद्ध तरी..
2 कुटुंबसंकुल : शाश्वत विकासाचा वसा
3 कोकणच्या हापूसपुढे तामिळनाडूच्या आंब्याचे आव्हान
Just Now!
X