नवी मुंबई पालिका निवडणुकीत ‘मविआ’ला रोखण्यासाठी व्यूहरचना

विकास महाडिक, लोकसत्ता

महाविकास आघाडीने (मविआ) वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहाच्या बंद सभागृहात आयोजित केलेल्या मनोमिलन मेळाव्याला भाजपने राज्यातील दहा हजार पदाधिकाऱ्यांना बोलवून नेरुळ येथील रहेजा संकुलातील खुल्या सभागृहात शनिवारी चोख उत्तर दिले. या निवडणुकीत भाजपचे नेते गणेश नाईक यांना पालिकेबाहेर ठेवू या महाविकास आघाडी नेत्यांच्या निर्धाराला पालिकेत भाजपचीच सत्ता येणार, असे प्रतिआव्हान भाजपच्या नेत्यांनी दिले. ‘मविआ’ने आघाडीचे नेते प्रचारात उतरविण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर भाजपनेही जशास तसे उत्तर देत  नवी मुंबई पालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

एप्रिलमध्ये होणाऱ्या नवी मुंबई पालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. गेल्या महिन्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे राज्यातील सत्तेच्या सत्ताधाऱ्यांनी वाशीत एक तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मिती केली. निवडणुकीनंतर राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीन पक्ष नवी मुंबईसारख्या एका पालिकेच्या सत्तेसाठी निवडणूकपूर्व एकत्र आल्याने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली होती. राज्यातील नेत्यांनी वाशीत घेतलेल्या मनोमिलन मेळाव्यानंतर येथील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढल्याने गेली अनेक दशके गळा आवळायला निघालेले कार्यकर्ते गळ्यात गळा घालून कार्यक्रम घेऊ लागल्याचे चित्र आहे. तीन पक्षांच्या या एकीचे बळ पाहून भाजपच्या नगरसेवकांचे तर अवसानच गळू लागले आहे. त्यामुळे राज्यात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येईल अशी अटकळ बांधून नाईक यांच्यासह भाजपमध्ये गेलेले नगरसेवक एक एक करून माघारी परतत आहेत. आजवर सात नगरसेवकांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  जाण्याची पूर्ण तयारी केली आहे. सोमवारी चार नगरसेवकांनी राजीनामा देऊन त्याची सुरुवात केली आहे. ही गळती यापुढे दहा ते १५ नगरसेवकांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाईक गडाचे बुरुज ढासळू लागल्याने भाजप आणि त्याची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नवी मुंबईला ऊर्जा देण्यासाठी रविवारी कार्यकर्त्यांची फौजच मैदानात उतरवली होती.

गेली अनेक वर्षे विरोधकांशी एकटय़ाने दोन हात करणाऱ्या नाईकांसाठी ही मोठी कुमक मानली जात आहे. महाविकास आघाडीच्या वातावरण निर्मितीला जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षानाच मैदानात उतरविण्यात आले आहे. मविआच्या त्या मनोमिलन मेळाव्याला भाजपाने रविवारी दिलेल्या उत्तराने येथील भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. नवी मुंबई हे एक छोटा भारत मानला जात आहे. देशातील प्रत्येक राज्याचा नागरीक या नवी मुंबईतील क्षेत्रात राहात आहे. त्यांच्या अनेक समाज संघटना कार्यरत असून भाजपाने हा धागा बरोबर पकडला आहे. नवी मुंबईतील प्रत्येक भागात भाजपामधील जात पात प्रांत धर्माचा नेता प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. त्यांच्या नियुक्ता या राज्य पातळीवरुन ठरविल्या जाणार आहेत. नवी मुंबईत राहणाऱ्या देश आणि राज्यातील भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकाचे नाव, पत्ता, मोबाईल घेण्यात आले आहे. या पत्यांवर भाजपाचे कार्यकर्ते स्वत: हजेरी लावणार आहेत.

११ लाख मतदार संख्या असलेल्या नवी मुंबईत एक लाख कार्यकर्ते उतरविण्याची तयारी भाजपाने ठेवली आहे. मतदारांशी सातत्याने संर्पक ठेवताना प्रत्येक कार्यकर्त्यांला केवळ ठराविक मतदार नेमून दिले जाणार आहेत. नवी मुंबईतील नाईक आणि म्हात्रे यांच्यातील वाद मिटविण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

चार नगरसेवकांचा राजीनामा

दोन आठवडय़ापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेणारे तुर्भे येथील  सुरेश कुलकर्णी आणि त्यांच्या तीन समर्थक नगरसेवकांनी सोमवारी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नवी मुंबईत पुढील महिन्यात अजित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण विरुद्ध देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंढे, विनोद तावडे, चंद्रकात पाटील, असा शिमगा पेटणार आहे.

‘विजय आपलाच आहे, पण गाफील राहू नका’

भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात नवी मुंबई आणि औरंगाबाद पालिका निवडणुकांच्या तयारीचे रणशिंग वरिष्ठ नेत्यांनी फुंकले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पालिकांवर भाजप विजयाचा  दावा केला. त्याच वेळी नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत कोणीही गाफील राहून चालणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. त्यामुळे या वेळी शिवसेनेला औरंगाबाद पालिका निवडणुकीच्या प्रचारात तोंड दाखवता येणार नसल्याची जोरदार टीका फडणवीस यांनी केली.