भाजप सदस्यांचे पालिकेच्या नगरसचिवांना पत्र

पनवेल पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली व्हावी यासाठी फासे टाकण्यास भारतीय जनता पक्षाने सुरुवात केली आहे. त्याचा पहिला अंक सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला. या सोमवारी आयुक्तांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केल्यानंतर येत्या सोमवारी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडणार असल्याचे पत्र भाजपच्या सदस्यांनी नगरसचिवांना दिले. एकीकडे शिंदे यांच्या बदलीसाठी भाजप खटाटोप करत असताना सर्वसामान्य पनवेलकरांनी मात्र शिंदे यांच्या बाजूने ‘विश्वासदर्शक ठराव’ घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बुधवारी शहरातील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानावर हा ठराव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आयुक्त पनवेलमध्ये राहणार की जाणार याची चर्चा सध्या सर्वत्र आहे.

आयुक्तांमुळे गेल्या दोन वर्षांत पनवेलचा विकास खुंटला आहे, त्यांनी आकृतिबंध महासभेत सादर केला नसतानाही तो नगरविकास विभागाकडे पाठविल्याचा प्रचार केला, असा आरोप सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केला आहे. आयुक्त शिंदे यांच्या अल्प अनुभवावर बोट ठेवून त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी भाजप करीत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच भाजप सदस्यांनी आयुक्तपदीच शिंदेच पाहिजेत अशी मागणी केली होती, मात्र आता चित्र पुरते पालटले आहे.

स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्यासह चार नगरसेवकांनी महापौरांना पत्र पाठवून अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी नगरसचिव अनिल जगधनी यांना अविश्वास ठराव मांडण्यासाठी तारीख ठरविण्याचे आदेश दिले. सोमवारी २६ मार्च रोजी महापालिकेच्या फडके नाटय़गृहात विशेष सभा बोलविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पनवेल महापालिकेत नागरिकांनी आमच्यावर विश्वास टाकून सत्तेच्या पदावर बसविले आहे. प्रशासन पनवेलच्या विकासाला बाधक ठरत असेल तर त्यांच्यावर अविश्वास आणण्याची ताकद भाजपमध्ये आहे. अविश्वास ठरावासाठी लागणारे संख्याबळ भाजप सभागृहात सिद्ध करेल, असा विश्वासही स्थायी समिती सभापती पाटील यांनी व्यक्त केला.

पनवेलकर, शेकाप आयुक्तांच्या पाठीशी

बुधवारी सायंकाळी सहा वाजता मिडलक्लास सोसायटीच्या मैदानावर होणाऱ्या आयुक्तांवरील विश्वास ठरावाला शेकाप महाआघाडीने पाठिंबा दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी येथे उपस्थित राहावे, यासाठी महापालिकेतील विरोधी पक्ष झटत आहेत.