पारंपरिक मतांमुळे लाभ; शिवसेनेला नवख्यांचा फटका

उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत १४०० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने भाजपने नगराध्यक्षपदासह सत्ता काबीज केली. शहरातील पारंपरिक मतांसह विकासाच्या मुद्दय़ावर मिळालेल्या मतांमुळे भाजपचा विजय झाला.

शिवसेनेला १८ पैकी १७ नवखे उमेदवार दिल्याने पराभवास सामोर जावे लागले. तर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे अशा चार पक्षांची मोट बांधूनही उरण शहर परिवर्तन महाआघाडीला आपले खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीत आघाडीच्या चारही पक्षांची खरी ताकद उघड झाली. यात २०११ च्या निवडणुकीत युतीच्या विरोधात स्वतंत्र लढूनही तीन जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला सर्वात अधिक नुकसान झाले आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती तुटल्याने उरण विधानसभा मतदार संघात शेकाप, काँग्रेस, शिवसेना व भाजप तसेच मनसे आणि राष्ट्रवादी अशी पंचरंगी निवडणूक झाली होती.

या निवडणुकीत उरण शहरात भाजप १२०० मतांनी आघाडीवर होती. त्यामुळे भाजपला उरण शहरातील परंपरागत मते मिळणार हे निश्चित होते. तर सेना दुसऱ्या व काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यानंतर राष्ट्रवादी व मनसे हे पक्ष होते.

दोन वर्षांनंतर झालेल्या उरण नगर परिषदेच्या निवडणूक निकालातही हेच चित्र दिसत आहे. शहरात भाजपचा क्रमांक पहिला तर सेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातच केंद्र आणि राज्यात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आल्याने त्यांच्या मतांत वाढच झाल्याचे या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. भाजपने विकासाच्या नावाने निवडणुकीचा प्रचार सुरू केल्याने सेनेनेही त्याच मार्गाने जात आपलीही सत्ता राज्यात असल्याने विकास करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजपने मुख्यमंत्र्यानाच प्रचारात उतरविले. २० नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार संपेपर्यंत इलेक्ट्रॉनिक फ्लेक्सवरून त्यांचे भाषण सुरू होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांचाही फायदा भाजपला झाला. शिवसेनेचे उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र शिवसेनेने नवखे उमेदवार दिल्याने त्यांचा भाजपच्या उमेदवारांसमोर निभाव लागला नाही. चार पक्षांनी एकत्र येत उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली. मात्र चार पक्षांच्या कार्यकर्त्यांतील दुरावा कायम राहिल्यामुळे व शहरातील ताकद अल्प असल्याने आघाडीला अपेक्षेप्रमाणे मते मिळवता आली नाहीत.