20 September 2020

News Flash

पंचायत समितीचे सभापतीपद भाजपकडे

देवकीबाई कातकरी यांची बिनविरोध निवड

(संग्रहित छायाचित्र)

देवकीबाई कातकरी यांची बिनविरोध निवड

पनवेल : गेली ६० वर्षे शेकापने पनवेल पंचायत समितीचे सभापतीपद राखले असले तरी सोमवारी झालेल्या सभापतीपदाची माळ भाजपच्या देवकीबाई कातकरी यांच्या गळ्यात पडली. पुढील अडीच वर्षांसाठी आदिवासी प्रवर्गातील महिलेसाठी सभापतिपद आरक्षित असल्याने आणि देवकीबाई या एकमेव सदस्य पनवेल पंचायत समितीत असल्याने देवकीबाई यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जानंतर कोणताही प्रतिस्पर्धी अर्ज न आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी देवकीबाई यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

देवकीबाई या भाजपच्या वतीने वहाळ पंचायत समितीच्या गणातून निवडून आलेल्या सदस्या आहेत. पनवेल पंचायत समितीवर आजवर शेकापचा लालबावटा फडकत होता. १६ सदस्यीय पंचायत समितीत शेकापचे बहुमत असताना आरक्षणामुळे हे पद भाजपकडे गेले. पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई यांचे माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी व इतर स्थानिक नेत्यांनी अभिनंदन केले. पनवेल पंचायत समितीवर शेकाप व मित्र पक्षांचे १६ पैकी १० सदस्य असल्याने उपसभापतिपद कोळखे येथील भरत म्हात्रे यांना राखून ठेवण्यात शेकापला यश आले.

शेकापची सत्ता पंचायत समितीवर असल्याने पनवेलच्या ग्रामीण भागावर अनेक वर्षे सत्ता राखता आली होती. पनवेल पालिकेच्या स्थापनेमुळे तालुक्यातील २९ गावांच्या समावेश पालिकेत झाल्यानंतर पनवेल तालुक्यातील इतर गावांमध्ये भाजपने पाळेमुळे घट्ट करण्यास सुरुवात केली. सोमवारी पंचायत समितीच्या सभापतिपदाचा पहिला मान देवकीबाई यांना मिळाल्यानंतर पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळात पंचायत समितीच्या प्रशासकीय भवनाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे, पाणीपुरवठा, घनकचरा विल्हेवाट, आरोग्यसेवा असे अनेक पायाभूत प्रश्न भाजपला सोडवावे लागणार आहेत.

६०व्या वर्षी तालुक्याचा कारभार

पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती पदाचा मान देवकीबाई यांना वयाच्या ६० व्या वर्षी मिळाला. पनवेल पंचायत समितीचे सभापती पद अनूसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने १६ पैकी देवकीबाई कातकरी या एकमेव सदस्य असल्याने त्या नशीबवान ठरल्या. मूळच्या कोंबडबुजे गावातील रहिवाशी असणाऱ्या देवकीबाई यांच्या पतींचे काही वर्षांपूर्वी  निधन झाले. कोंबडभूजे हे गाव विमानतळ प्रकल्पाच्या कामात पुनर्वसनाच्या प्रक्रियेमुळे अनेकांना घरे सोडावे लागले. त्यापैकी देवकीबाई या एक आहेत. गावे पुनर्वसनापूर्वी देवकीबाईंनी मागील वर्षांपर्यंत इतरांच्या शेतामध्ये भातशेती व मत्सशेती करून त्यांनी उदरनिर्वाह केला. सध्या त्या उलवा नोडमधील यशवंत भगत यांच्या कुटुंबासमवेत राहतात. दहा वर्षे देवकीबाईंना ग्रामपंचायत सदस्य पदाचा अनुभव आहे. सोमवारी देवकीबाई यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मंगळवारपासून देवकीबाई यांना तालुक्याचा कारभार पाहावा लागणार असून अडीच वर्षे त्यांचा नवीन राजकीय प्रवास सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2019 1:01 am

Web Title: bjp won panchayat samiti chairman zws 70
Next Stories
1 स्थानबद्धता छावणी नेरुळमध्ये नाहीच ; ‘सिडको’चे स्पष्टीकरण
2 हॉटेलमालकांना तंबी
3 अपात्र ठेकेदारासाठी सत्ताधाऱ्यांचा आटापिटा?
Just Now!
X