News Flash

चटणी-भाकरी हाच आमचा दिवाळी फराळ

चटणी आणि भाकर हाच आमच्या दिवाळीच्या सणांचा फराळ असल्याचे त्यांनी जड अंत:करणाने सांगितले.

स्थलांतरित झालेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा
गुरांना चारा नाही, पिण्याला पाणी नाही, राबायला शेत नाही, हाताला पीक नाही अशी अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. दुष्काळ पडल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लोंढे शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहे. नवी मुंबईतही तुभ्रे, सानपाडा, नेरुळ, ऐरोली या भागात हे कृषिवल आले असून दिवाळीच्या सणाचा गोडवा त्यांच्या जीवनातून नाहीसा झाला आहे. चटणी आणि भाकर हाच आमच्या दिवाळीच्या सणांचा फराळ असल्याचे त्यांनी जड अंत:करणाने सांगितले. लखलखत्या नवी मुंबईच्या पादचारी पुलांखाली या कुटुंबीयांनी उघडय़ावरच संसार थाटला आहे.
तुभ्रे येथील उड्डाण पुलाखाली संसार मांडलेल्या उस्मानाबाद येथील शशिकला आत्राम यांनी यंदाची दिवाळी आम्हाला नकोशी झाल्याचे सांगितले. शेतात पीक नाही आणि पिके जगवण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण कुटुंब स्थलांतरित झाले आहे. दिवाळीच्या उत्साहाचा सर्वत्र जल्लोष होत असताना पेटलेली चूल हीच आमच्यासाठी दीपज्योती असल्याची भावना पाणावलेल्या डोळयांनी व्यक्त केली.
गावामध्ये दिवाळी आम्ही उत्साहात साजरा करतो. मात्र यंदा दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने आम्ही करायचे काय आणि दिवाळी साजरी करायची कशी अशी खंत, लातूरच्या निलंगा येथून आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बैलजोडी विकून आणि उरलेली शेती गहाण ठेवून मुंबापुरीमध्ये पडेल ते काम करून या दुष्काळावर मात करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यानी सांगितले. रोजच्या जीवनात असणारी चटणी-भाकरी आणि आभाळाचे छत्र यातच आपली दिवाळी असल्याचे या दुष्काळी भागांतील शेतकऱ्यांनी सांगितले.
मदतीच्या हातांची गरज
ग्रामीण भागामध्ये दुष्काळ पडल्याने मुंबापुरीत दाखल झालेल्यांना आज अनेक मदतीच्या हातांची गरज आहे. अनेक जण दिवाळीचा सण साजरा करतात. दिवाळी पहाट, फराळ, फटाके अशी अनेकांवर खर्च करतात. परंतु मदतीचा हात देण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:40 am

Web Title: black diwali for drought affected farmers
टॅग : Farmers
Next Stories
1 यंदाच्या भाऊबीजेला कोटींची उड्डाणे
2 पन्नास रुपयांच्या फटाक्यांत दिवाळी
3 मुंबईतील मिठागरे, कचराभूमीचा नवी मुंबईला ताप
Just Now!
X