एमआयडीसीतील सामाईक सांडपाणी प्रकल्पातून प्रवाह रस्त्यावर

कोटय़वधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचा आरोप

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीतील सामाईक सांडपाणी शुद्धीकरण (सीईटीपी) प्रकल्पातून  निघणारे  काळ्या रंगाचे पाणी  रस्त्यावर वाहत असल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. मध्यंतरी कोटय़वधी रुपये खर्चून शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात आली होती. पावसाळ्यात प्रकल्पातून शुद्धीकरण होऊन सांडपाणी नदीत सोडणे अपेक्षित असताना ते रस्त्यावर सोडले जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

रासायनिक सांडपाणी नदीत थेट सोडण्यात येते त्यामुळे जलप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून सरकारी विविध प्रशासनापर्यंत केल्या जातात. मात्र दिल्लीच्या राष्ट्रीय हरित लवादामध्ये याबाबत सुनावणी झाल्यानंतर तळोजातील जल प्रदूषणात बदल झाला नाही. सर्व कारखान्यातून उत्पादनानंतर निघणारे सांडपाणीवर शुद्धीकरण प्रक्रिया करण्याची जबाबदारी ‘सीईटीपी’ची आहे. मात्र, ज्या ‘सीईटीपी’ने नियंत्रण ठेवायला हवे त्याच  प्रकल्पातून रस्त्यावर काळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) केली आहे.

नगरसेवक म्हात्रे यांनीच तळोजातील प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आणला. लक्ष वेधण्यासाठी याबाबतची याचिका हरित लवादाकडे मांडण्यात आली. त्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दखल घेत त्यावेळच्या सीईटीपीच्या संचालक मंडळावर फौजदारी कारवाईचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखानदारांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाला पोलीस ठाणे आणि न्यायालयात दाद मागावी लागली होती.

सीईटीपी प्रकल्पाची जबाबदारी संचालक मंडळाची असल्याने त्यावेळी फौजदारी गुन्हे संचालक मंडळावर दाखल करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर सीईटीपीची जबाबदारी एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, तरीही प्रदूषण कायम आहे.