पूनम धनावडे

पालिका आरोग्य सुविधांची पूर्तता करण्यास कमी पडत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात रक्त चाचणी तपासणी करण्यासाठी लागणारी यंत्रणा बंद असल्याने बाह्य़ रुग्णांना तपासणीकरिता खासगी रुग्णालयांत धाव घ्यावी लागत आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागात वाशीतील रुग्णालय महत्त्वाचे आहे. नवी मुंबई शहरातील बहुतांशी रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. सध्या वातावरणात बदल होत असल्याने साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. उन्हाळा, ढगाळ वातावरणाने व्हायरल ताप, सर्दी यांसारख्या आजारांची लागण होत आहे. अशा वेळी आजारांच्या निदानासाठी डॉक्टर रक्त चाचण्यांचा सल्ला देतात. पालिका रुग्णालयांत मात्र सद्य:स्थितीत केवळ दाखल केलेल्या रुग्णांचीच रक्त तपासणी होत आहे. डॉक्टरांनीच रक्त तपासणीचा सल्ला दिलेल्या बाह्य़ रुग्णांना मात्र यंत्रणेअभावी बाहेरून खासगी रुग्णालयात जाऊन रक्त तपासणी करून घ्यावी लागत आहे.

सीबीसी, डेंग्यू, लेप्टो आदी तापाच्या साथीच्या चाचण्या गेल्या महिन्याभरापासून बंद आहेत. तसेच अनेक शस्त्रक्रियांसाठीच्या मूत्रपिंड तपासणी, यकृत तपासणी या महागडय़ा चाचण्यादेखील उपलब्ध नसल्याने नाइलाजाने रुग्णांना जादा पैसे मोजून त्या खासगी प्रयोगशाळेतून कराव्या लागत आहेत.

रक्त तपासणी चाचण्या काही यंत्रे बंद असल्याने करता येत नाहीत. त्यामुळे सद्य:स्थितीत आंतररुग्णांच्या सर्व तपासण्या व चाचण्या होत आहेत. यंत्रणा सुरळीत होण्यासाठी त्याचा कार्यादेश मागविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच बाह्य़ रुग्णांच्याही चाचण्या केल्या जातील.

– दयानंद कटके, आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका