23 July 2019

News Flash

नवी मुंबईकरांच्या ‘स्वच्छ’ सहभागावर मोहोर

नागरिक प्रतिसाद’ विभागात देशातील सर्वोत्तम शहर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे ‘नागरिक प्रतिसाद’ विभागात देशातील सर्वोत्तम शहराचा पुरस्कार बुधवारी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी स्वीकारला.

नागरिक प्रतिसादात देशात प्रथम; स्वच्छतेत सातव्या स्थानी तर अमृत शहरांमध्ये प्रथम दहामध्ये

केवळ लोकसहभागाअभावी दरवर्षी पिछाडीवर पडणाऱ्या नवी मुंबईला स्वच्छ भारत अभियानात पुढे नेण्यासाठी प्रशासनाने साधलेला लोकसंवाद लागू पडला असून स्वच्छ अभियानातील नवी मुंबईकरांच्या सहभागावर केंद्राने बुधवारी अखेर शिक्कामोर्तब केले. ‘नागरिक प्रतिसाद’ विभागात देशातील सर्वोत्तम शहर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मागील वर्षीचे देशातील स्वच्छतेमधील मानांकन दोनने उंचावत सातव्या क्रमांकावर झेप घेतली, तर महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे अमृत शहरांमध्ये प्रथम दहामध्ये नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे.

बुधवारी नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे झालेल्या विशेष समारंभात केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाचे केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा, स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही.के. जिंदाल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्वच्छ नवी मुंबई मिशन समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

गेली चार वर्षे सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई पालिकेने नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. दोन वर्षांपूर्वी देशातील ४६८ शहरांच्या स्पर्धेत नवी मुंबईने राज्यात पहिला व देशात आठवा क्रमांक पटकाविला होता. गेल्या वर्षी साडेचार हजार शहरांच्या स्पर्धेत पालिकेला नववा क्रमांक मिळाला. पालिकेने पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या अनेक उपाययोजनेत घनकचरा व्यवस्थापनाला पहिली पसंती देऊन केंद्र सरकारने नवी मुंबईचे कौतुक केले होते. मात्र लोकसहभाग कमी पडत होता. देशात सातत्याने अव्वल येणाऱ्या इंदूर शहरातील प्रत्येक नागरिक व विद्यार्थी स्वच्छतादूत झाल्याने हे शहर स्वच्छतेचा आदर्श ठरत होते. मात्र नवी मुंबई पायाभूत सुविधांमध्ये देशात सर्वात सरस असताना केवळ लोकसहभाग आणि राजकीय निरुत्साहामुळे हे शहर गेल्या वर्षी नवव्या क्रमांकावर फेकले गेले होते. बेड सिटी असलेल्या शहरातील लोकांचा लोकसहभाग आणखी न वाढल्यास हे शहर स्वच्छ भारत अभियानात अव्वल येण्याची आशा होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने या वर्षी लोकसंवादावर भर दिला होता.

केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीद्वारे विविध स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करीत असताना नागरिकांशी साधलेल्या संवादातून त्यांच्याकडून स्वच्छतेविषयी अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्वच्छता अ‍ॅपवरही नागरिक प्रतिसादाची नोंद घेण्यात येत होती. याशिवाय स्वच्छ भारत मिशनच्या केंद्रातून कोणत्याही नागरिकास दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे १९६९ या टोल फ्री क्रमांकावरून तसेच वेब पोर्टलवरूनही स्वच्छताविषयक प्रश्नावलीतून नवी मुंबईतील नागरिकांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सहयोगाने केलेले स्वच्छताविषयक काम व त्याला नागरिकांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेस ‘लोकसहभागात’ देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे.

शहर ठरले ‘थ्री स्टार’चे मानकरी

या वर्षी केंद्रीय निरीक्षक पथकाने स्टार रेटिंगच्या निकषानुसार कागदपत्रे व प्रत्यक्ष तपासणी केली असून नवी मुंबई शहर ‘थ्री स्टार रेटिंग’चे मानकरी ठरले आहे. त्याचप्रमाणे हागणदारीमुक्त शहरामध्येही नवी मुंबई महानगरपालिकेस ‘ओडीएफ’ डबल प्लस रेटिंग प्राप्त झाले आहे.

स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबई शहराला देशात सातवे स्थान मिळाले असून नागरिक प्रतिसादात देशात प्रथम क्रमांकावर नवी मुंबईने नाव कोरले आहे. या सर्व यशस्वी वाटचालीत नवी मुंबईकरांचा सक्रिय सहभाग मिळाला असल्याने हे बक्षीस तमाम नवी मुंबईकरांचे. या नावलौकिक प्राप्त करून देणाऱ्या शहरवासीयांचे आभार.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

First Published on March 7, 2019 1:20 am

Web Title: blossom on clean participation of navi mumbai