01 June 2020

News Flash

शवागारातून मृतदेह बेपत्ता

नवी मुंबई पालिका रुग्णालयातील प्रकार

प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई पालिका रुग्णालयातील प्रकार; नऊ दिवसांनंतरही शोध नाही

नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात नेण्यात आला. मात्र नऊ दिवसांनंतरही शवागारात हा मृतदेहच सापडत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पालिका आयुक्तांनी याला दुजोरा दिला असून तो करोना रुग्ण नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेले नऊ दिवस मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी संयम ठेवल्यानंतर रविवारी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

नेरुळ येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय तरुणाची प्रकृती खराब झाल्याने नेरुळ येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ९ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. गेले नऊ दिवस त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास चालढकल करण्यात आली. त्यानंतर मात्र नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर त्या तरुणाचा मृतदेहच शवागारात सापडत नसल्याचा प्रकार समोर आला. हे समजल्यानंतर नातेवाईकांनी थेट वाशी पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे पोलिसांनी नेमका प्रकार काय आहे, हे सांगण्यास नकार दिला. मात्र पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याला दुजोरा दिला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या तरुणाचा मृत्यू करोनामुळे झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर समोर येणार आहे.

तक्रारी नेहमीच्याच..

आरोग्य प्रशासनाच्या कारभाराबाबत नेहमीच तक्रारी येत असतात. करोना संकटानंतरही मृतदेह ताब्यात देण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात आता शवागारात मृतदेह सापडत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2020 3:32 am

Web Title: body missing from mortuary at municipal hospital vashi zws 70
Next Stories
1 लॉकडाउनमुळे कर्जात बुडालेल्या टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या, नवी मुंबईतील घरात घेतला गळफास
2 एपीएमसीतील १७२३ जणांची वैद्यकीय तपासणी
3 नवी मुंबईतून बाहेर जाणारे दहा हजार, येणारे केवळ ४३ जण
Just Now!
X