राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा

श्रीगणेश गृहसंस्थेचे अध्यक्ष या नात्याने इतर पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून सोसायटीतील दोन सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  या प्रकरणी गावडे यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलीस तपास करीत असून गेले तीन दिवस गावडे हे  फरार असल्याची माहिती नेरुळ पोलिसांनी दिली.

श्री गणेश गृहसंस्थेतील स्वत:च्या मालकीच्या दोन सदनिका अध्यक्ष गावडे आणि संचालकांनी बनावट कागदपत्रे आणि खोटय़ा व्यक्ती उभ्या करून विकल्याची तक्रार कौस्तुभ कुलकर्णी यांनी २७ ऑगस्ट रोजी नेरुळ पोलीस ठाण्यात केली होती. १३ एप्रिल २०१९ रोजी वडिलांचे निधन झाल्यानंतर सदनिका स्वत:च्या नावावर करण्यासाठी कौस्तुभ यांनी गृहसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

दोन्ही सदनिका कौस्तुभ यांची आई मृणाली आणि वडील सुधाकर कुलकर्णी यांच्या नावे होती. परंतु सुधाकर यांचे निधन २००६ साली झाल्याचे भासवून खोटय़ा मृत्यूच्या दाखल्याच्या आधारे नवीन ‘शेअर सर्टिफिकेट’ संस्थेकडून देण्याचा आरोप कौस्तुभ यांनी तक्रारीत केला आहे. तसेच आमची घरे बनावट कागदपत्रांच्या व संस्थेच्या अध्यक्षांच्या आणि संचालकांच्या मदतीने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कुलूप तोडून संतोष तावरे  यास विकण्यात असल्याचे तक्रारीत म्हटले होते.

त्याप्रमाणे नेरुळ ठाण्यात १७ ऑक्टोबर रोजी गावडे आणि  सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गावडे हे बेलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्याच वेळी तात्काळ कारवाई करण्याबाबत पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप कौस्तुभ कुलकर्णी यांच्या वतीने वकील अ‍ॅड. पांडुरंग पोळ यांनी केला आहे.  बनावट कागदपत्रांच्या आधारे घरे विकल्याच्या प्रकरणात संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम ४४८, ४२६, ४६५, ४६७, ४७१ व ३४ अन्वये नेरुळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे  यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

बनावट कागदपत्रांच्या आधारे घरे विकल्याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तीन दिवसापांसून पोलीस अशोक गावडे यांचा शोध घेत आहेत. परंतु ते फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत. -राजेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेरुळ, नवी मुंबई.