कळंबोली वसाहतीतील सेक्टर-१ मधील सुधागड विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी एका हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. हा बॉम्ब असल्याचे नंतर स्पष्ट झाले असून पुण्याच्या सीआरपीएफच्या खास पथकाने तो निकामी करण्याचे काम रात्री उशीरा सुरू केले होते.

हा बॉम्ब रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ठेवल्याचे तसेच बॉम्बसोबत सापडलेल्या घडय़ाळ्यातील वेळ पडताळली असता या बॉम्बचा स्फोट १२ तासांनंतर झाला असता, असे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी सांगितले.  सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या या सुधागड विद्यालयात सुमारे आठ हजार मुले शिकतात. उन्हाळी सुटीनंतरचा शाळेचा आजचा पहिलाच दिवस होता. सोमवारी दुपारी १२ वाजता शाळा भरली तेव्हा शिक्षकांनी प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळा सुरू झाल्यानंतर प्रवेशद्वारापासून हाकेच्या अंतरावर उभी असलेली एक हातगाडी विद्यालयाचे सुरक्षारक्षक अरुण विश्वकर्मा आणि शिपाई गोकुळ कुंभार यांनी पाहिली. त्यांना गाडीवर एक थर्माकोलचा लाल रंगाचा खोका आढळला. तो उघडल्यावर त्यात आणखी एक थर्माकॉलचा खोका होता. त्यात १२ व्होल्ट क्षमतेची बॅटरी आणि त्यावर घडय़ाळ लावल्याचे त्यांना आढळले. खोक्याच्या एका बाजूला सुमारे पाच लिटर पेट्रोल भरलेली बाटलीही त्यांना सापडली. त्यांनी याची माहिती प्राचार्य इक्बाल इनामदार यांना दिली. प्राचार्यानी कळंबोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बॉम्बसदृश वस्तू असलेली हातगाडी ढकलत पोलीस ठाण्याच्या इमारतीपर्यंत आणली आणि बॉम्बशोधक पथकाला माहिती दिली.

बॉम्बशोधक पथक दुपारी ३च्या सुमारास दाखल झाले. मात्र श्वानपथक आणि बॉम्बशोधक यंत्राची मदत घेण्यासाठी पोलीस ठाण्याची इमारत सुरक्षित नसल्याचे या पथकाने सांगितल्यावर ही हातगाडी उद्यानाच्या मोकळ्या जागेत आणण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार तेथे दाखल झाले. कळंबोली येथे सापडलेली बॉम्बसदृश वस्तू आणि आपटा येथे एसटीत सापडलेला बॉम्ब यांच्यात साम्य आहे का, या प्रश्नाचे उत्तर तपासणीनंतरच मिळू शकेल, असे आयुक्त संजयकुमार यांनी स्पष्ट केले. नवी मुंंबई पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकाला तो बॉम्ब आहे किंवा काय आणि तो बॉम्ब असेल तर त्याची क्षमता नेमकी किती हे निश्चित करणे कठीण गेले. त्यामुळे पुण्याहून खास पथकाला पाचारण केले गेले. हे पथक रात्री नऊ वाजता दाखल झाले. त्यानंतर कळंबोलीपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या खिडुकपाडा गावी निर्जनस्थळी त्यांनी बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू केले.

बॉम्बशोधक पथकाला या बॉम्बभोवती सिमेंटचा सुमारे तीन इंचाचा थर आढळला. मात्र मोठय़ा तीव्रतेचा  बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिमेंटचा थर का लावला जाईल, अशी शंका आयुक्त संजयकुमार यांनी पत्रकारांना माहिती देताना व्यक्त केली. बॉम्बसदृश वस्तूजवळ सापडलेली पाच लिटर पेट्रोलची बाटली स्फोटानंतर आगीचा भडका उडविण्यासाठी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय घडले?

* रविवारी रात्री ९ : सुधागड विद्यालयाजवळ बॉम्बचा खोका असलेली हातगाडी अज्ञात समाजकंटकाने आणून ठेवल्याचा तर्क.

* सोमवार दुपारी १२ : शाळेच्या पहिल्या दिवशी मुले येत असताना शाळेच्या रक्षकांना ही हातगाडी दिसली. त्यांनी खोके उघडून पाहिल्यावर बॉम्बसदृश वस्तू असल्याचे उघड. शाळेने पोलिसांना कळविले. पोलिसांनी हातगाडी पोलीस ठाण्यालगत नेली.

* दुपारी ३ : बॉम्बशोधक पथक दाखल. मात्र बॉम्ब आहे की नाही, हे त्यांना कळेना.

* रात्री ९ : पुण्याहून सीआरपीएफचे खास पथक दाखल. बॉम्बच असल्याचे स्पष्ट. तो निकामी करण्याचे काम रात्री उशीरा सुरू.