20 September 2020

News Flash

मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी बॉटनिकल उद्यानाचा आधार

तुर्भे कचराभूमीवरील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण

तुर्भे कचराभूमीवरील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण केंद्रावर दररोज निर्माण होणारी धूळ, त्यामुळे मध्यंतरी १५ दिवस बंद असलेले केंद्र, नागरिकांच्या विरोधामुळे निर्बीजीकरणाचे बासनात गुंडाळावे लागलेले केंद्राचे तीन प्रस्ताव, स्मार्ट सिटीत मोकाट कुत्र्यांचे वाढलेले प्रमाण यासाठी एमआयडीसीतील नऊ एकर जमिनीवरील प्रस्तावित बॉटनिकल उद्यानाच्या एका कोपऱ्यात हे निर्बीजीकरण केंद्र लवकरात लवकर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे. २०१२ च्या नोंदीनुसार नवी मुंबई पालिका क्षेत्रात २९ हजार भटकी कुत्र्यांची संख्या असून यानंतर दहा हजारांची भर पडली आहे.
भटक्या कुत्र्यांना मारण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यामुळे सर्वच शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण जलदगतीने करणे हा यावर एकमेव उपाय आहे. सक्षम निर्बीजीकरण केंद्र नसल्याने नवी मुंबईत तर या कुत्र्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नवी मुंबईत दिवसाला १२०० कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया होणे आवश्यक असताना हा आकडा सध्या पाचशेच्याच घरात आहे. १९९३ पासून कोपरी येथे दोन हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर असलेले निर्बीजीकरण केंद्र बंद पडल्याने तुर्भे येथील कचराभूमी केंद्राच्या कोपऱ्यात हे केंद्र हलविण्यात आले आहे. या ठिकाणी एका दगडखाणीतून निर्माण होणाऱ्या प्रचंड धुलिकणांमुळे येथील ३३ कामगार बेजार झाले आहेत. नोकरी नको पण धूळ आवरा असे म्हणण्याचे पाळी या कामगारांवर आली आहे.
तोंडावर मास्क बांधून हे कामगार कसे तरी काम करीत आहेत. त्यामुळे या निर्बीजीकरणाला पर्यायी जागा उपलब्ध न झाल्यास आहेत ते कामगारदेखील या केंद्राला अलविदा करण्याच्या विचारात आहेत. हा प्रश्न निर्माण झालेला असताना सानपाडा सेक्टर २४ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाला स्थानिक नागरिकांना लोकप्रतिनधींच्या माध्यमातून विरोध केल्याने हा प्रकल्प रखडला आहे, तर शिरवणे येथे कत्तलखाना सुरू करण्यास काही धार्मिक संघटनांनी विरोध केल्याने त्या प्रकल्पाचा गाशा पालिका प्रशासनाला गुंडाळावा लागला आहे.
कोपरी, शिरवणे, सानपाडा येथे भटक्या कुत्र्यावरील निर्बीजीकरणाला विरोध झाल्याने आता पालिका प्रशासनाने एमआयडीसीत सिडकोच्या वतीने देण्यात आलेल्या बॉटनिकल उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या नऊ एकर जमिनीपैकी एक एकर जमिनीवर भटकी कुत्री निर्बीजीकरण केंद्र बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 7:55 am

Web Title: botanical garden use for to control stray dogs
टॅग Stray Dogs
Next Stories
1 पुरातत्त्व व भूशास्त्र विषयासंबंधी प्रदर्शन
2 नाटय़ संमेलनाध्यक्षांच्या शालींची ऊब आदिवासींना
3 ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना गुरुकिल्ली
Just Now!
X