ब्रिज व्ह्य़ू को-ऑपरेटिव्ह सोसायटी

आवारातील मोकळ्या जागेचे व्यवस्थित नियोजन करून गरजेनुसार त्यात लहान मुलांसाठी बाग, बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात आले आहे. पार्किंगसाठी जागेचा वापर ही ‘ब्रिज व्ह्य़ू को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ची खासियत. झाडे जोपासा आणि त्याची फळे मिळवा, अशी योजनाही ‘ब्रिज व्ह्य़ू’ने अमलात आणली आहे.

नेरुळ येथील सेक्टर-२ मध्ये १९८७ साली सिडकोने उच्च उत्पन्न गटासाठी ही वसाहत वसवली. यात एनएल-६ टाइपच्या १ ते ७ अशा सात इमारती आहेत. त्यात एकूण ११२ कुटुंबे राहतात. रहिवाशांना बसण्यासाठी इमारतीच्या आवारात ठिकठिकाणी डेरेदार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्या वृक्षांभोवती कठडे बांधण्यात आले आहेत. इमारत क्रमांक ४ आणि ६ मधील जागेत लहान मुलांना खेळण्यासाठी बालोद्यान तयार करण्यात आले आहे. इमारतींभोवती अधिकाधिक हिरवळ तयार करण्यावर अनेकांचा भर असतो.

मुलांमधील खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी ६० फुट बाय ३० फूट या आकाराचे फुटबॉल आणि २० फूट बाय १२ फूट आकाराचे बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. पहाटेपासूनच येथील जागेवर खेळांना सुरुवात होते. यासाठी प्रकाशाची खास सोय करण्यात आली आहे. पार्किंगसाठी गृहसंस्थेच्या प्रवेशद्वाराच्या आवारात ये-जा करण्यासाठी लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकच प्रवेशिका ठेवण्यात आली आहे. दुचाकीची पार्किंग इमारतीच्या समोरील भागात, तर चारचाकीसाठी इमारतीच्या मागील बाजूस स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. वाहने उभी करताना रहिवासी स्वयंशिस्त पाळतात.

इमारतीतील वृक्षांच्या आरोग्यासाठी वाळवी प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येते. उंदरांचा उपद्रव आणि डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीही औषधफवारणी करण्यात येते.

इमारतीत, मोकळ्या जागेत, मैदानांत, तसेत पार्किंग परिसरातही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. इमारतींमध्ये एलईडी दिवे विजेची बचत करण्यात येते. इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रणा बसविण्यात आली आहे. याच्या वापराविषयी प्रशिक्षणही रहिवाशांना देण्यात आले आहेत.

ओला व सुका कचरा वैयक्तिक पातळीवर वेगळा करण्यात येतो. सेवानिवृत्त रहिवासी गृहसंस्थेचे कामकाज सांभाळतात. प्रत्येक इमारतीच्या समस्या, सूचना लिहिण्यासाठी दोन सभासदांची निवड करण्यात आली आहे. इमारतीतील मोकळ्या जागांची वेळोवेळी साफसफाई केली जाते. बाहेरील वाहनांना सोसायटीच्या आवारात प्रवेशास मनाई असली तरी आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, गर्भवतींना खास सवलत देण्यात आली आहे. सोसायटीच्या कार्यालयांच्या ११ ते १ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळांचे पालन काटेकोरपणे केले जाते. राष्ट्रीय सणांसाठी खास वेगळा राखीव निधी ठेवण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येते. या वेळी लहान मुलांसाठी धावण्याच्या स्पर्धा, संगीत खुर्ची यांसारखे कार्यक्रम ठेवण्यात येतात. बक्षिसांचे वितरण केले जाते.

सोसायटीच्या आवारात १७ नारळाची झाडे आहेत. यातून मिळणारे नारळ वाजवी किमतीत रहिवाशांना वाटप केले जातात. यातून मिळणारी रक्कम झाडांसाठी खत वा औषधांसाठी वापरली जाते. याशिवाय आवारात असलेल्या पेरू, सीताफळ, चिकू या फळांचे रहिवासी वाटप करतात. झाडे जोपासा आणि मोबदला घ्या, या तत्त्वाचे पालन हे रहिवासी करतात.

सोसायटीचे सर्व व्यवहार धनादेशाने होतात. त्याचबरोबरच कार्यालयाची सर्व कामे संगणकीकृत करण्यात आली आहेत. इमारतीच्या हिशेबांचे लेखापरीक्षण तज्ज्ञांकडून करवून घेण्यात येते. नवरात्रोत्सव ही येथील सणांची पर्वणी आहे. घटस्थापनेनंतर गरब्यासाठी नऊ दिवस इमारतीतील रहिवासी परीने महाप्रसादाची व्यवस्था करतात. नवव्या दिवशी सोसायटीच्या वतीने सहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. या वेळी भजन, कीर्तनेही होतात. २०१२ साली असोसिएशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचा मोठा सोहळा पार पडला. त्या वेळी तत्कालीन नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी तंटामुक्त सोसायटी म्हणून या सोसायटीला प्रशस्तीपत्रक दिल्याची माहिती सचिव लक्ष्मी शर्मा यांनी दिली..