वित्त संस्थामध्ये सुमारे दोन हजार कोटींची गुंतवणूक केल्याने मजबूत शिलकी

केंद्र आणि राज्य सरकारचे अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर लागलीच शहराचा र्अथसंकल्प जाहीर करण्यास नवी मुंबई पालिका प्रशासन तयार असून सध्या सर्व विभागांची जमा आणि खर्चाचा ताळेबंद रचला जात आहे. विविध वित्त संस्थामध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याने मजबूत शिलकी बाजू असलेल्या पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प मात्र वास्तववादी राहणार आहे.

गेल्या वर्षी हा ताळेबंद तीन हजार कोटी रुपयांच्या घरात गेला होता. त्यानंतर तो वाढवून तीन हजार ६०० कोटींपर्यंत नेण्यात आला होता. यंदा हा आकडा न फुगवता वास्तव आकडे ठेवले जाणार आहेत. मुंबई, पिंपरी चिंचवड पालिकांनंतर नवी मुंबई पालिका राज्यातील एक श्रीमंत पालिका गणली गेली आहे. अलीकडे केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात हे शहर देशात राहण्यास दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे आहे. त्यामुळे या शहरातील पायाभूत सुविद्या चांगल्या असल्याचे मानले गेले आहे. सिडको आणि पालिकेने उभ्या केलेल्या या सुविद्यांची आता देखभाल करणे हा एक प्रमुख काम आहे.

शहर, ग्रामीण आणि झोपडपट्टी क्षेत्राने व्यापलेल्या या शहरातील औद्योगिक नगरी आणि व्यापार यामुळे स्थानिक स्वराज्य करापोटी एक हजारापेक्षा जास्त रक्कम जमा होत आहे तर मालमत्तांच्या वाढलेल्या किमतीमुळे या करापोटी पाचशे कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत दरवर्षी जमा होत असून तीन लाखांच्या घरात येथील मालमत्ता नोंद झालेल्या आहेत.

त्यामुळे पालिकेची अर्धी जमेची बाजू या दोन करांतून सांभाळली जात असून इतर करापोटी तेवढीच रक्कम जमा होत आहे. यंदा पालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वाढीव चटई निर्देशांक ( एफएसआय) अंर्तगत पुनíवकास प्रकल्प उभे राहण्याची शक्यता आहे. या बदल्यात पालिकेच्या तिजोरीत विकास कर येण्याची शक्यता असून पालिकेच्या तिजोरीत भर पडणार आहे. त्यामुळे मूळ शिल्लक अथवा येणारे अनुदान वजा करता पालिकेचा अर्थसंकल्प दोन हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात तो प्रथम स्थायी समितीत सादर केला जाणार आहे.

यंदा पालिकेत जमा होणाऱ्या निधीत नेरुळ येथील विज्ञान पार्क, वाशी येथे आंतरराष्ट्रीय तरण तलाव अधिक अद्ययावत बस आगार आणि शहरभर १२००सी सी टीव्ही हे तीन महत्त्वाच्या प्रकल्पांची सुरुवात केली जाणार आहे.

यंदाचे वर्ष हे लोकसभा व विधानसभा निवडणुकींचे असल्याने आचारसंहितेच्या काळात अनेक कामांना खिळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही नागरी कामांचा निधी शिल्लक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पाची चर्चा सध्या प्राथमिक पातळीवर सुरू आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणाला सध्या पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या चर्चेला अद्याप वेग आलेला नाही पण सर्वसाधारणपणे फेब्रुवारीमध्ये हे अंदाजपत्रक सादर केले जाईल. स्यायी समिती व सर्वसाधारण सभेत या अंदाजपत्रकात वाढ व कपात केली जात असल्याचा अनुभव आहे.  – धनराज गरड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, नवी मुंबई पालिका