घाटकोपर इमारत दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन

नवी मुंबईतील मालमत्ता कर भरणाऱ्या ३ लाख ७ हजार इमारतींपैकी सुमारे ५० टक्के इमारती या ३० वर्षे जुन्या आहेत. यातील ८०० हून अधिक इमारती सध्या धोकादायक अवस्थेत आहेत. यातील ३२५ इमारतीच पालिकेकडून धोकादायक म्हणून जाहीर झाल्या आहेत. यात ग्रामीण भागातील जुन्या इमारतींचा समावेश नाही. मुंबईत घाटकोपर येथील सिद्धीसाई इमारत दुर्घटनेनंतर शहरातील इमारती आणि अन्य बांधकामांना संरचना परिक्षण करून घेण्यासाठी पालिकेने आवाहन केले आहे.

खाडीलगतच्या बांधकामाची झीज वेगाने होते. यात बांधकामासाठी वापरलेले लोखंड तातडीने गंजते. त्यामुळे सिडकोने बांधलेल्या ३० वर्षे जुन्या इमारतींच्या छताचा भाग कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यात नेरूळ सेक्टर-६ मधील गुनाबाई लोंढे या वृद्धेचा स्लॅब कोसळून मृत्यू झाला.

मुंबईतील सिद्धीसाई इमारतीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच ३० वर्षे जुन्या इमारतींचे संरचना परिक्षणाचे आदेश दिले आहेत. नवी मुंबईत तीन लाख सात हजार ७१० बांधकामांची करधारणा करण्यात आलेली आहे. पालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी हे सर्वेक्षण केलेले आहे; मात्र याशिवाय बेकायदा तसेच सर्वेक्षण न केलेली सुमारे २५ हजार बांधकामे शिल्लक असण्याची शक्यता आहे. या सर्व इमारतींचे ‘लिडार’ (लाईट डिटेक्शन अ‍ॅन्ड रेजिंग टेक्नॉलॉजी) प्रणालीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील या एकूण मालमत्तांपैकी ५० टक्के मालमत्ता या ३० वर्षे जुन्या असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. सिडकोने वाशी सेक्टर एकमध्ये १९७६ मध्ये बांधलेल्या पहिल्या इमारती जर्जरावस्थेत आहेत. त्यातील दोन इमारतींची काही वर्षांपूर्वी दीड एफएसआयने पुनर्बाधणी झालेली आहे. सिडकोने बांधलेल्या काही अलीकडील इमारतींचेही छत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय खासगी विकासकांनी बांधलेल्या तसेच ग्रामीण भागात प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली राहती घरे ३० वर्षांची झालेली आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने बांधलेली बैठी घरे तसेच कोपरखैरणे येथील माथाडी घरांनीही ३० वर्षांचा टप्पा ओलांडलेला आहे. त्यामुळे ही संख्या एक दीड लाखापर्यंत आहे. या सर्व बांधकामांचे घरमालकांनी आयआयटी, पालिका, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण करून घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

यापूर्वी ठाण्यात घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतरही नवी मुंबई पालिकेने शहरातील इमारती तसेच इतर बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आवाहन केले होते, पण त्याला अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची पालिका सक्ती करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

घाटकोपर इमारत दुर्घटनेनंतर शहरातील सर्व बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे. यापूर्वी दोन वेळा अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होते, पण रहिवासी हे आवाहन गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे ३० वर्षे जुन्या इमारतींचे पालिका सर्वेक्षण करणार आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका