X

बुलेटच्या आवाजाचा शहरात धुमाकूळ

वाहन चालविताना वाहनांमधून किमान ५० डेसिबलपर्यंत आवाज हा नियमात आहे.

नागरिक त्रस्त; आरटीओला मात्र तक्रारीची प्रतीक्षा

बुलेट या दुचाकीची क्रेझ तरुणाईमध्ये वाढल्याचे चित्र असून या वाहनाचा फटफट करणारा आवाज आणि वेगाशी स्पर्धा करण्याच्या क्षमतेमुळे सध्या शहरांमध्ये बुलेटचा धुमाकूळ सुरू आहे. मात्र या वाहनातील सायलेन्सरमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने हा आवाजाचा उच्छाद कधी बंद होणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. मात्र नागरिकांच्या या त्रासाकडे आरटीओ प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असून तक्रार आल्यास कारवाई करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

वाहन चालविताना वाहनांमधून किमान ५० डेसिबलपर्यंत आवाज हा नियमात आहे. मात्र शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या बुलेटचा आवाज हा  ८० ते ९० डेसिबल इतका असल्याने या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. यासाठी बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा केले जाणारे बदल कारणीभूत आहेत. शिवाय या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे एखादा वाहनचालक दचकून अपघाताचीदेखील शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेकदा हे बुलेटचालक या आवाजाचा त्रास इतरांना होतो, याची कुठलीही तमा न बाळगता वावरत असतात. त्यामुळे या बुलेटच्या आवाजाला आता लगाम कोण घालणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

ग्राहकांकडून सायलेन्सरमध्ये फेरबदल

बुलेटचा सायलेन्सर हा  परिवहनाच्या नियमानुसार बसविलेला असतो. मात्र काही ग्राहक वाहन विकत घेतल्यानंतर बाहेरून त्यात बदल करून घेतात. यामध्ये सायलेन्सर बदलला जातो किंवा त्यावरील रबर ट्रॅप बसविला जातो. त्यामुळे फटाक्यासारखा मोठा आवाज होतो, असे स्पष्टीकरण बुलेट तयार करणाऱ्या कंपनीने दिले आहे.

बुलेटच्या मोठय़ा आवाजाने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे ध्वनिप्रदूषणातदेखील भर पडत आहे. या विरोधात परिवहन विभागाकडे ऑनलाइन तक्रार केली असता तुम्ही संबंधित वाहनांची तक्रार केल्यानंतर कारवाई होईल, असे उत्तर देण्यात येते.

सुरेश देशमुख, नागरिक

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात नागरिकांनी तक्रार केल्यास त्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

संजय डोळे, परिवहन अधिकारी, नवी मुंबई

शहरात रस्त्यावर धावणाऱ्या बुलेटमुळे ध्वनिप्रदूषण होत आहे. अनेक वेळा नियमांचे उल्लंघन करुन  हे  चालक वाहन चालवतात. मात्र त्याच्यांवर कारवाई करायची म्हटली तर ते भरधाव वेगात निघून जातात.

प्रवीण पांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, खारघर

Outbrain