दहशतवादी हल्ला झाल्यास तो परतवून लावण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे बंकर्स ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गाच्या अनेक स्थानकांवर उभारण्यात आले होते, मात्र या बंकर्सची योग्य देखभाल न झाल्याने त्याचे कचराकुंडय़ांमध्ये रूपांतर झाले आहे. या बंकर्समध्ये उभे राहण्यासारखी स्थिती नसल्याने रेल्वे पोलीस बल व राखीव पोलीस दलाच्या जवानांना स्थानकावरील बाकडय़ांवर बसावे लागत आहे. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांना नुकतेच धमकीचे एक पत्र आले आहे. महापालिका, सिडको कार्यालय तसेच ट्रान्स हार्बरवरील स्थानके उडविण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. याची दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. ट्रान्स हार्बर मर्गावरील ऐरोली, रबाले, घणसोली, कोपरखरणे, वाशी, सानपाडा, सीबीडी, नेरुळ या रेल्वे स्थानकांवर सतर्कता बाळगण्यात येत आहे.  या स्थानकांमधील बंकर्सची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. या बंकर्समध्ये रेल्वे प्रशासनाचेच कर्मचारी कचरा टाकतात, असे एका सफाई कामगाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.