बेलापूर ते बामण डोंगरी मार्गच नसल्याचे चौकशीतून उघड

नागरी सुविधांबरोबरच दळणवळणांच्या सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बस सेवेकडून २३ क्रमांकाचा नवीन बस मार्ग सुरू करण्याचे फलक लावण्यात आले आहेत. त्यानुसार बेलापूर स्थानक, दिवाळे गाव, किल्ले गावठाण, महापालिका कार्यालय, रेती बंदर, मोठा उलवा, वहाळ ते बामण डोंगरी असा मार्ग असल्याचा हा फलक आहे. या फलकासंदर्भात एनएमएमटी प्रशासन तसेच परिवहन विभागाशी संपर्क साधला असता अशा प्रकारचा कोणताच नवीन मार्ग सुरू होत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्याच फलकामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. मात्रएनएमएमटीच्या स्पष्टीकरणामुळे  नागरिकांत नाराजी आहे.

उलवे नोडमधील रहिवाशांच्या प्रवासासाठी एनएमएमटीने १७ व १८ या दोन क्रमांकाच्या बसेस सुरू केल्या आहेत. या बसेसमुळे नागरिकांना काही प्रमाणात प्रवासाची सोय झालेली आहे. असे असले तरी येथील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी असल्याने अधिक बसेस सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्याचवेळी उलेव नोडमधील एनएमएमटीच्या एका बस स्थानकात महानगरपालिकेकडूनच लावण्यात आलेल्या फलकावर २३ क्रमांकाचा नवीन बसचा मार्ग सुरू करण्यात येणार असल्याची जाहिरात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या संदर्भात एनएमएमटी परिवहन विभागाचे सभापती मोहन म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारचा कोणताही नवीन मार्ग एनएमएमटीकडून सुरू केला जात नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे ही जाहिरात कोणी केली असा सवाल उपस्थित झाला आहे. या फलकाची माहिती एनएमएमटी विभागालाच नसल्याने फलक कोणी लावला हा प्रश्न निर्माण झाला आहे.