नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक ८८ मध्ये रविवारी झालेल्या एका पोटनिवडणुकीने शहरातील राजकीय दिशा स्पष्ट झाली आहे. ‘हम सब एक है’ असे भासवणाऱ्या शिवसेना भाजपा युतीचे कार्यकर्ते आणि नेते एकमेकांचे पाय खेचण्यात आजही मश्गूल असल्याचे दिसून आले. सार्वत्रिक निवडणुकीत एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या युतीतील नेत्यांना जंग जंग पछाडून एक पोटनिवडणूक जिंकता आली नसल्याचे स्पष्ट झाले.
नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या एका जागेसाठी रविवारी मतदान व मतमोजणी पार पडली. ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजप युतीने प्रतिष्ठेची केली होती.. ऐरोलीतील काँग्रेसचे नगरसेवक आनंदा काळे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आपला उमेदवार उभा न करता राजकीय परिपक्वता गतसत्रात दाखविली होतीे. राष्ट्रवादीने उमेदवार उभा न केल्याने शिवसेनेनेही उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे काळे यांची पत्नी शशिकला काळे ह्य़ा बिनविरोध निवडून येऊ शकल्या होत्या. राजकारणात हे तारतम्य पाळण्याची अपेक्षा केली जात असताना मालदी यांच्या आत्महत्येनंतर रिक्त झालेल्या एका जागेसाठी काँग्रेसने गतवर्षी पराभूत झालेल्या नूतन राऊत यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढविली. या राऊत यांनी राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार शिल्पा कांबळी यांना घाम फोडला होता. मतदानाचा अधिकार नाकारणाऱ्या ६० मतदारांनी राऊत यांच्या पारडय़ात मतदान केले असते तरी त्या विजयी झाल्या असत्या अशी स्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसचे माजी नगरसवेक संतोष शेट्टी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी यांना ही जागा निवडून देण्याची मोठी जबाबदारी होती. त्यामुळे दोन शेट्टीच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल, असे वाटत असताना शिवसेना भाजपाच्या उमेदवार सरस्वती पाटील यांनी केवळ एक हजार मते मिळाली.

आमच्यासाठी काम केले नाही..
शिवसेना भाजपमधील सख्य जगजाहीर आहे. त्यामुळे भाजपच्या कोटय़ातील ही जागा प्रथम शिवसेनेने नगरसेवक नामदेव भगत यांच्या पत्नी इंदुमती भगत यांच्यासाठी मागण्यात आली होती; पण भाजपच्या येथील सर्वेसर्वा आमदार मंदा म्हात्रे यांनी ती देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याच वेळी भाजपच्या पराजयाची घोषणा काही सेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. त्यामुळे आमच्यासाठी काम करीत नसल्याची तक्रार भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली होती. त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून आले असून सेनेची काही मते काँग्रेसच्या पारडय़ात पडल्याचा आरोप केला जात आहे. या एका निवडणुकीमुळे शहरातील राजकारणाची चित्र स्पष्ट झाले आहे.