एकास अटक; गाडी मालकांची दीड कोटीची फसवणूक

नवी मुंबई कंपनीत गाडय़ा भाडय़ाने लावून देतो, असे आमिष दाखवून परस्पर त्या गाडय़ा सावकाराकडे गहाण ठेवत गाडीमालकांची एक ते दीड कोटीची फसवणूक करणाऱ्या एका भामटय़ास तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. वर्षभरात त्याने २३ गाडय़ांचे असे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. यापैकी २० गाडय़ांचा तपास लागला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मनोज पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पनवेलनजीक पेठाली गावातील आहे. याबाबत राजकुमार मुंढे या उरण येथे राहणाऱ्या व्यक्तीने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तपास करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के.डी. लातुरे यांनी मनोजचा पत्ता मिळवून त्याला अटक केली. त्याला अटक केल्यावर केवळ मुंढेच नव्हे तर त्याने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले.

मनोज तळोजा एमआयडीसी व परिसरात वेल्डर-फिटरचे छोटे मोठे काम करून गुजराण करीत होता. मात्र रातोरात श्रीमंत होण्याचे विचार त्याच्या मनात घोळत होते. त्यातून एमआयडीसीमध्ये काम करीत असल्याने विविध कंपन्यांना गाडय़ांची मागणी कायम असते, हे त्याने हेरले. सुरुवातीला काही ओळखीच्यांकडून गाडय़ा भाडेतत्त्वावर करार करून घेत या गाडय़ा कंपन्यांना दिल्या. त्यामुळे अनेकांनी आपल्या गाडय़ापण भाडय़ाने लावून दे, अशी विनवणी त्याला केली. त्याने गेल्या वर्षी थेट जाहिरात देत आतापर्यंत २३ गाडीमालकांशी भाडेकरार केला. मात्र गाडय़ा कंपन्यांना भाडय़ाने न देता कल्याण भागातील काही खाजगी सावकारांच्याकडे गहाण ठेवल्या. आतापर्यंत एक ते दीड कोटीची रक्कम सावकारांकडून उचलली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत ८६ लाख रुपयांच्या २० गाडय़ांचा छडा लावण्यात आला असून ३ गाडय़ांचा शोध सुरू आहे. आरोपीने अजून कोणाला फसवले असेल तर तळोजा पोलिसांशी संपर्क साधावा.

– के.टी लातुरे, पोलीस उपनिरीक्षक