राजकीय पुढारी, पोलिसांसमोर शाळा व्यवस्थापनाचे पितळ उघडे
कळंबोलीतील कार्मेल कॉन्व्हेंट विद्यालयाने पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी ३३ हजार ५०० रुपयांऐवजी २७ हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दहा दिवसांपासून कार्मेल कॉन्व्हेंट विद्यालय व्यवस्थापनाने पालकांना विश्वासात न घेता पूर्व प्राथमिक नवीन प्रवेशासाठी दहा हजार रुपयांनी प्रवेश शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे कळंबोली वसाहतीतील पालकांनी राजकीय पक्षांचा आधार घेत विद्यालयाच्या हेकेखोर कारभाराविरोधात एकजूट निर्माण केली. याविरोधात आंदोलनाचाही इशारा देण्यात आला होता. मात्र विद्यालय व्यवस्थापनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मध्यममार्ग स्वीकारला. शुल्कवाढीच्या मुद्दय़ावर पोलीस आणि शिक्षण विभागाने विद्यालय व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मध्यस्थीची भूमिका मांडली.गरुवारी रायगड जिल्ह्य़ाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे, जिल्हा परिषदेच्या महिला विभागाच्या सभापती प्रिया मुकादम आणि काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्षाचे नेते यांच्या उपस्थितीत शुल्क कमी करण्याचा निर्णय लेखी जाहीर केला.

करारमोड..
१७ वर्षांपासून कार्मेल विद्यालय सुरू आहे. आजवरच्या इतिहासात कठोर शिस्त आणि गुणवत्ता यांना प्राधान्य देणाऱ्या शाळा व्यवस्थापनाने पालकांचा दबाव आणि स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना याशिवाय पोलिसांना जुमानले नाही; परंतु यंदा पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी थेट १० हजार रुपयांची वाढ केल्यामुळे १२० पालकांपैकी चार पालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले, असे विद्यालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गुरुवारच्या बैठकीत याच विद्यालयाच्या व्यवस्थापनाने पोलीस, शिक्षणाधिकाऱ्यांसमोर आगळावेगळा प्रस्ताव जाहीरपणे मांडला. ज्या चार पालकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, त्यांना थांबवा, केवळ त्यांच्याच पाल्याची शुल्कवाढ ‘थेट’ कमी करू, असा ‘प्रस्ताव’ काही पत्रकार आणि राजकीय पुढाऱ्यांसमोर ठेवण्यात आला; मात्र चारही पालकांनी व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला धुडकावत आम्ही १२० पाल्यांच्या शुल्कासाठी लढत असल्याचे सािंगतल्यावर शाळा व्यवस्थापनाने भूमिका बदलली. राजकीय पक्षांचे नेते अभिजीत पाटील, आत्माराम कदम, सुदाम पाटील यांनी शाळेच्या व्यवस्थापनाच्या नियमावलीचा अभ्यास केला. सिडको प्रशासनासोबत १९९८ मध्ये अमर सेवा समिती या संस्थेने केलेल्या करारानुसार कळंबोली ही अत्यल्प उत्पन्न गटातील रहिवाशांची वसाहत असल्याने येथे माफक दरात विद्यार्थ्यांना कार्मेल विद्यालयात शिक्षण देण्यात येईल, असे हमीपत्र लिहून दिले होते. त्याची प्रत या वेळी पालकांनी दाखवली. अवघ्या १४ लाख भूखंड कसा मिळवला आणि त्यावर प्रत्येक वर्षी कशी शुल्कवाढ लादली गेली, याचा पाढाच पालक व नेतेमंडळींनी मांडला. या बैठकीत रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती प्रिया मुकादम यांच्यासोबत पंचायत समितीचे सदस्य गोपाळ भगत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजय खानावकर, रामदास शेवाळे, शेखर जळे, भाजपचे अमर पाटील, शिवसेनेचे दीपक निकम, डी.एन. मिश्रा, समाजवादी पक्षाचे अनिल नाईक यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली.