पनवेल महापालिकेसाठी झालेली पहिलीच निवडणूक गाजली ती ‘लक्ष्मीच्या पावलां’मुळे. घराघरांत, उमेदवारांच्या कार्यालयांत, बूथवर, आडोशाला सर्वत्र भरलेल्या मतविक्रीच्या बाजारामुळे आज पनवेलमधील बहुसंख्य मतदारांचे खिसे ‘गुलाबी’ झाले होते. निवडणूक आयोगाचे अधिकारी, पोलीस यांच्या नाकावर टिच्चून आणि लोकशाहीतील सर्व संकेत व सभ्यता धाब्यावर बसवून पनवेलमध्ये हा मतविक्रीचा जनता बाजार शांततेने पार पडला. त्याकरिता अनेक उमेदवारांनी किमान दीड ते दोन कोटी रुपयांची व्यवस्था केल्याचे सांगितले जाते. काही प्रभागांमध्ये तर हा आकडा सव्वादोन कोटींच्या पुढे गेल्याचेही समजते.

या बाजाराचे वैशिष्टय़ म्हणजे येथील मतदारही त्यात हिरिरीने सहभागी झाले होते. पुढील पाच वर्षे कोणत्याही पक्षाचा उमेदवार आपल्याला तोंड दाखविणार नाही, हे अनुभवाने आलेले शहाणपण गाठीशी असलेल्या मतदारांनी उमेदवारांना ‘धुवून घेणे’ हेच उद्दिष्ट ठेवले होते. आजच्या दिवसात त्यामुळे अनेकांनी घरटी किमान आठ हजार रुपयांची कमाई केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या सामाजिक भ्रष्टाचाराबद्दल शहरातील काही जुनेजाणते सुजाण नागरिक खेद व्यक्त करीत असून, या भ्रष्टाचाराला राजकीय पक्षांहून मतविक्री करणारे मतदार अधिक जबाबदार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

पनवेल पालिकेच्या या निवडणुकीतील अनेक उमेदवार कोटय़धीश असून, त्यांतील अनेक जण आलिशान गाडय़ांतून फिरत असतात.

अशा उमेदवारांकडून चीड भावनेने पैसे वसूल करण्याचीही एक प्रवृत्ती येथील मतदारांमध्ये आढळून आली. काही मतदारांशी यासंदर्भात संवाद साधला असता, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले, की पैसे वाटपात कोणताही राजकीय पक्ष मागे नाही. हे सगळे पैसेवाले आजच त्यांच्या थैल्या रिकाम्या करतात. त्यांचा हा काळा पैसा समाजातील गोरगरीबांच्या हाती आला तर त्यात काय बिघडले? या अशा प्रवृत्तीमुळे येथील अनेक प्रभागांत मतामागे ५०० ते दोन हजार रूपये असा भाव फुटला होता.

घरोघरी ही पैशाची पाकिटे वाटली जातच होती. पण काही ठिकाणी बुथवर मतदान पावती घेण्यासाठी येणाऱ्या मतदारांना आडोशाला नेऊन त्यांच्या घरातील मतदारसंख्येनुसार त्यांच्या हाती पैशाचे पाकीट ठेवले जात होते.  मात्र काही ठिकाणी याला अपवादही दिसले. काही सोसायटय़ांमध्ये झालेल्या पैसे वाटपाचा प्रयत्न तेथील जागरूक नागरिकांनी उधळून लावला. एकीकडे अशा प्रकारे सर्रास मतांची खरेदी-विक्री सुरू असताना निवडणूक आयोगाचे अधिकारी-कर्मचारी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसल्याचे दिसत होते.

याबाबत काही उमेदवारांशी संपर्क साधला असता, त्यांनी नकार दिला. पण खासगीत मात्र ते ‘नाईलाजाने हे करावे लागते’ अशी प्रतिक्रिया देत होते.  पैसे वाटपात जो मागे पडला, तो कायमचा पडला, अशी पनवेलमधील राजकारणाची गत असल्याने सगळ्यांनाच हे करावे लागते, असे ते सांगत होते. या सगळ्या ‘नाईलाजा’तून आपण लोकशाहीचा केवढा मोठा पराभव करीत आहोत, भावी पिढीला कशा प्रकारे मतव्यापार शिकवित आहोत, याची पर्वा कुणालाही नव्हती.

मत-संवाद

पोलीस पत्नी : अहो त्या पाटील ताई घेऊन आलेल्या पाकीटात एकच हजार रुपये आहेत.

पोलीस : मग तू दोघांनाच मते दे आणि घरी ये

पत्नी : अहो पण शेजारच्यांना दोन हजार रुपयांचे पाकीट मिळाले.

पोलीस : मिळालेत तेवढय़ावरच समाधान मान, त्या पाटीलताईंनी एक हजार रुपये खाल्ले असतील.

पत्नी – मग मी दुसऱ्या उमेदवाराकडून जास्त पैसे मागू का?

पोलीस – अग नको, ज्याचे पैसे घेतलेच त्यांनाच मत दे.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

महिला – घरात या. आमच्या घरात आठ मते आहेत.

मढवी काकी – चांगलं आहे. आठ मतं आमच्याच उमेदवारांना द्या

महिला – ताई देऊ, अजून मी मतदान केलं नाही. तुमचं पाकीट कुठे आहे

मढवी काकी – पाकीट म्हणजे मतदान स्लिप ना, ही घ्या, तुमच्या कुटूंबातील मतदारांची नावे द्या.

महिला – ते पाकीट नाही, त्या दोन उमेदवारांनी दिले ना, तसे पैशांचे पाकीट, एका मतदाराला दोन हजार रुपये देतात ते

मढवी काकी – आमचा उमेदवार गरीब आहे.

महिला – जा मग, मी नाही करणार मतदान तुमच्या पक्षाला