X

सीबीडी सर्कल हटवणार

शीव-पनवेल महामार्गावरील सीबीडी सर्कलवर वाहतूक कोंडीची समस्या तीन वर्षांपासून तीव्र झाली आहे.

पालिकेचा सकारात्मक प्रतिसाद; वाहतूक कोंडी हटण्याची अपेक्षा

वाहतूक कोंडीला कारण ठरलेले सीबीडी सर्कल हटविण्याच्या वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गेली चार वर्षे यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याला पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दर पावसाळयात आणि दिवाळीत सर्कलसभोवती प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तो आता लागणार नाही, अशी आशा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

शीव-पनवेल महामार्गावरील सीबीडी सर्कलवर वाहतूक कोंडीची समस्या तीन वर्षांपासून तीव्र झाली आहे. त्यामुळे सर्कल हटविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने पालिकेकडे वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला. त्याला पालिका आयुक्तांनी प्रतिसाद दिला आहे, असे वाहतूक शाखा उपायुक्त नितीन लोखंडे यांनी सांगितले.

पावसाळ्यात सर्कलसभोवती सर्वाधिक खड्डे पडतात. यंदा वाहतूक कोंडी सर्वाधिक जाणवत होती. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पावसात वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. याविषयी पालिकेकडे समस्या मांडण्यात आली होती. मात्र पालिका प्रशासनाने या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केलेला नव्हता. सीबीडी सर्कल हटविण्याबाबत तत्कालीन वाहतूक शाखा उपायुक्तांनी पाालिका प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला होता.

उड्डाणपुलावर खड्डे

सीबीडी बेलापूरमध्ये कोकण भवनासमोर हे सर्कल आहे. बेलापूरमधील अंतर्गत वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या सर्कलचा वापर होईल, या अपेक्षेने ते बांधण्यात आले होते. सर्कलजवळ बसथांबा असल्याने शहर वाहतूक आणि बाहेर गावी जाणाऱ्या प्रवासी बस उड्डाणपुलाचा वापर न करता खालचा रस्त्याचा वापर करतात. यंदाच्या पावसाळ्यात उड्डाणपुलावरील डांबरी रस्त्याची चाळण झाल्याने अन्य वाहनेही पुलाखालील रस्त्यावरून धावत होती. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती.