|| संतोष जाधव

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेचा फटका, शिक्षक भरतीही लांबणीवर

सव्वा महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर १५ जूनपासून पुन्हा एकदा राज्यभरातील शाळांची घंटा वाजणार आहे. पालिकेच्या सीवूड्स व कौपरखैरणे येथील सीबीएसई शाळाही या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचा निर्धार पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला असला, तरीही या शाळा जुलैमध्येच सुरू होण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही शाळांना कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा फटका बसणार आहे. पालिका प्रशासनाने ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली आहे.

राज्यभरात पालिका शाळांतील पटसंख्या कमी होत असताना नवी मुंबई महापालिकेच्या शाळांधील विद्यार्थीसंख्या दरवर्षी वाढत आहे. सीवूड्स सेक्टर ५० येथे दोन वर्षांपूर्वी शाळेसाठी इमारत बांधण्यात आली. या इमारतीत महापालिकेची पहिली सीबीएसईची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे, मात्र पालिकेच्या संथ कारभारामुळे शाळा अद्याप कागदावरच आहे. प्रवेश प्रक्रिया न राबवल्याबद्दल सत्ताधारी व विरोधकांनी आंदोलन, उपोषण व अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी या शैक्षणिक वर्षांत सीवूड्स व कौपरखैरणे येथील पालिका इमारतीत सीबीएसईचे पहिलीचे वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरू करण्यासाठी खासगी शिक्षण संस्थांकडून प्रस्तावही मागवण्यात आले. मे. आकांक्षा फाऊंडेशनचा प्रस्ताव पात्र ठरल्याने विद्यार्थी संख्येनुसार नियुक्त करण्यात येणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनावरील खर्चाच्या ४५ टक्के खर्च संबंधित संस्था व ५५ टक्के खर्च पालिका करणार आहे. याबाबतच्या कराराचा प्रस्ताव मंजुरीसाठी शिक्षण विभागाने स्थायी समितीकडे पाठवला आहे, परंतु निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे इतर शाळांप्रमाणे येत्या १५ जूनला सीबीएसई शाळा सुरू होणे कठीण आहे.

पालिका प्रशासनाने अत्यावश्यक कामात जशी सवलत घेता येते तशी सवलत या नवीन शाळा सुरू करण्याबाबत घ्यावी, अशी मागणी निवडणूक आयोग व कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे, परंतु ती अद्याप मिळालेली नाही. २ जुलैला आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ निर्णय घेऊन सीबीएसई शाळा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त व शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली आहे. त्यामुळे शहरातील पालिकेच्या व खासगी अशा जवळजवळ सर्वच शाळा १५ जूनपासून सुरू होत असताना पालिकेच्या नेरुळ व कोपरखैरणे येथील पहिल्या सीबीएसई शाळेला मात्र जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्राथमिक विभागासाठी भरती करण्यात येत असलेल्या शिक्षकांनाही नियमानुसार आचारसंहितेनंतरच नेमणूक पत्र देण्यात येतील. त्यामुळे १५ जूनला महापालिकेच्या शाळा सुरू झाल्यानंतरही नव्याने भरती होणारे शिक्षक जुलैनंतरच अध्यापनासाठी उपलब्ध होणार आहेत.  – संदीप संगवे, शिक्षणाधिकारी

महापालिकेने नेरुळ व कोपरखैरणेत सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. परंतु पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे या शाळा २ जुलैनंतरच सुरू होतील. या शाळांमध्ये  पालिकेच्याच बालवाडीतील मुलांना घेतले जाणार असल्याने अडचण येणार नाही.    – डॉ. रामास्वामी एन., आयुक्त