News Flash

कांदळवनावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष

कोकण विभागीय आयुक्तांनी सीसी टीव्ही कॅमेरा जागांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.

कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन योग्य प्रकारे व्हावे यासाठी कांदळवनाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर सीसी टीव्ही कॅमरे बसवणार.

ठाणे खाडीकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात असलेल्या कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन योग्य प्रकारे व्हावे यासाठी कांदळवनाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर सीसी टीव्ही कॅमरे बसविण्यात यावेत, अशी सूचना नुकत्याच झालेल्या कोकण विभागीय खारफुटी संरक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी नवी मुंबई पालिकेला सीसी टीव्ही कॅमेरे बसवता येतील अशा जागांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. पालिका प्रशासनाच्या दृष्टीने चार ठिकाणी या कॅमेरांची नितांत गरज आहे.
नवी मुंबई व ठाणे शहरालगत असलेल्या खाडीकिनाऱ्यावरील खारफुटी नष्ट करण्याच्या अनेक क्लृप्ता भूमाफियांकडून लढवल्या असल्याचे आढळून आले आहे. खारफुटीवर मोठय़ा प्रमाणात राडारोडा (डेब्रिज) टाकून त्या ठिकाणी तयार होणाऱ्या जमिनीवर झोपडय़ा उभारण्याचे एक तंत्र कळवा, विटावा भागात वापरले जात आहे. नवी मुंबईत नेरुळ, सानपाडा, वाशी, ऐरोली, घणसोली या भागांतील खारफुटीवर रातोरात मुंबईतील डेब्रिज आणून टाकले जात असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. मुंबईतील डेब्रिज नवी मुंबईत टाकण्याचा एक गोरखधंदा गेली अनेक वर्षे सुरू असून यात काही स्थानिक लोकप्रतिनिधी व पालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यासाठी गाडीमागे पाचशे ते एक हजार रुपये घेतले जात असून रातोरात शेकडो गाडय़ा या खारफुटीवर खाली केल्या जात आहेत. पालिका या गाडय़ांवर कारवाई करण्याचे थातुरमातुर नाटक वटवीत असल्याचे दिसून आले आहे. खारफुटीचा नाश करणाऱ्या भूमफिया व काही बिल्डरांनी खारफुटी जळून जाईल अशा एका रासायनाचाही काही ठिकाणी प्रयोग केला आहे. नेरुळ येथील डीपीएस स्कूलच्या मागील पाणथळींत मोठय़ा प्रमाणात डेब्रिज आढळून आल्याने नवी मुंबई एन्व्हायर्न्मेंट प्रिव्हिटेशन सोसायटी या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे न्यायालयाने सिडको, पालिका, पोलीस प्रशासनांना खारफुटी संरक्षण व संवर्धनासाठी कठोर उपायययोजनांची करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यात सिडको, पोलीस, वन, पालिका आणि दोन पर्यावरण संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी या समितीची बैठक घेण्याचे बंधन न्यायालयाने घातले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत नवी मुंबई पालिका क्षेत्रात सीसी टीव्ही कॅमेरा लावण्यात यावेत अशी सूचना मांडण्यात आली. त्यामुळे या खारफुटीचा नाश करण्याऱ्या प्रवृत्तीवर २४ तास लक्ष राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी ही कल्पना पसंत पडली असून त्यांनी नवी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना अशा जागांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबई पालिकेने शहरात तीन वर्षांपूर्वी मोक्याच्या ठिकाणी २६८ सीसी टीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे त्यांना शहराला खेटून असणाऱ्या कांदळवनावर लक्ष ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमरे लावण्यासाठी जास्त खर्च येणार नाही, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे समजते. त्यानुसार पालिका पुढील आठवडय़ात या जागांचा शोध घेणार आहे. सर्वसाधारपणे नेरुळ, सेक्टर ५० येथील अनिवासी भारतीय संकुलामागील पाणथळीची जागा, सानपाडा येथील पामबीच मार्ग, वाशी येथील रघुलीला मॉलमागील क्षेत्र आणि घणसोली ते ऐरोली खाडीकिनारा अशा चार जागांवर २५ ते ३० सीसी टीव्ही कॅमेरांची आवश्यकता भासणार आहे. ही खर्चीक बाब असल्याने पालिकेला सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यात एक समस्या पालिकेसमोर येऊन ठेपणार आहे. हे क्षेत्र पालिका क्षेत्रात येत नसून वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खर्च करायचा की नाही, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासंर्दभात मुंबई उच्च न्यायालय अथवा कोकण विभागीय आयुक्त निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोकण विभागीय आयुक्तांनी सीसी टीव्ही कॅमेरा जागांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत. त्यानुसार पालिका पुढील महिन्याच्या बैठकीत अहवाल सादर करणार आहे. पालिकेने यापूर्वी खारफुटी संवर्धनासाठी अनेक उपाययोजना केल्या असून फलकाद्वारे जनजागृती तसेच खारफुटीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्स उभारले आहेत. काही ठिकाणी मोठी वाहने जाणार नाहीत असे मातीचे चर खोदण्यात आले आहेत. सीसी टीव्हीच्या खर्चाचा निर्णय नंतर घेण्यात येईल. त्याअगोदर सर्वेक्षण करणे आवश्यक असून, खारफुटी संरक्षणासाठी चार जागा महत्त्वाच्या आहेत.
अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:47 am

Web Title: cctv fit to keep eyes on mangrove forest
टॅग : Cctv
Next Stories
1 ते पनवेलची शोभा वाढवतात!
2 चटणी-भाकरी हाच आमचा दिवाळी फराळ
3 यंदाच्या भाऊबीजेला कोटींची उड्डाणे
Just Now!
X