ठेकेदाराला मुदतवाढच न मिळाल्याने काम बंद

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबईत पालिकेच्या माध्यमातून ७० ठिकाणी २८२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र महिनाभरापासून ते बंद असल्याची माहिती समोर आली आहे. ठेकेदाराला मुदतवाढ न मिळाल्याने व कामाचे पैसे न दिल्याने कॅमेरे बंद आहेत. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.

शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर राहण्यासाठी पालिकेने सत्तर ठिकाणी हे सीसीटीव्ही बसविले आहेत. निविदा प्रक्रियेद्वारे हे काम निर्मल डेटा कॉम या कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर अनेकदा ठेकेदाराला वार्षिक देखभाल दुरुस्तीसह मुदतवाढ देण्यात येत होती. मार्च २०२० पर्यंत या कामाची मुदत संपल्यानंतर पालिकेने मुदतवाढ दिली नाही. काम बंद करण्याचा इशारा ठेकेदाराने दिला होता. पोलिसांच्या विनंतीवरून गणेश विसर्जनापर्यंत ठेकेदाराने हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवले होते. मात्र, पालिका दुर्लक्ष करीत असल्याने अखेर त्याने काम बंद केले. त्यामुळे सव्वा महिन्यापासून कॅमेरे बंद आहेत.

महापालिका हद्दीतील महत्त्वाची निवडक ठिकाणे, नवी मुंबई शहरातील प्रवेशद्वारे, मुख्य चौक, मार्केट, बस डेपो, रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी देखरेखेसाठी हे कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावत होते. तसेच अनेक गुन्हे या सीसीटीव्हींमुळे उघडकीस आले आहेत. परंतु पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कॅमेरे बंद असल्याची स्थिती आहे. कॅमेरे सुरू करण्यात यावेत यासाठी पोलिसांनी पालिकेला लेखी पत्रही पाठवली आहेत.

निर्मल डेटा कंपनीच्या प्रतिनिधीस विचारणा केली असता, मार्च महिन्यापासून कामाची मुदतवाढ देण्याची मागणी पालिकेकडे करत आहोत, परंतु मुदतवाढ देण्यात आली नाही. देयकही मिळाले नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे सांगितले.

शहरातील सीसीटीव्ही गणेशोत्सवानंतर बंद आहेत. शहरातील अनेक गुन्ह्य़ांची उकल होण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होते. याबाबत पालिकेला पत्रव्यवहारही केला आहे. त्यामुळे तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होणे आवश्यक आहे.

– गिरीश ठाकरे, सहाय्यक आयुक्त, नवी मुंबई पोलीस

शहरात सीसीटीव्हींची अत्यंत आवश्यकता असून ठेकेदाराच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल व तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका