आणखी दोन आस्थापनांना टाळे

नवी मुंबई</strong> : नवी मुंबईत दैनंदिन करोना रुग्णांना नवा उच्चांक गाठत सहाशेपेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत. मात्र तरीही काही आस्थापना पालिका प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळत नसल्याचे समोर आले आहे. शहरातील ‘पब’मधील जल्लोष सुरूच असल्याने पालिका प्रशासनाने आणखी दोन ‘पब’ला टाळे ठोकले आहेत. यापूर्वी दोन ‘पब’वर अशीच कारवाई करण्यात आली आहे.

करोनाचे दैनंदिन रुग्ण वाढत असल्याने पालिका प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. यात दुकानांच्या व बारच्या वेळा कमी केल्या आहेत. तसेच या ठिकाणी करोना नियमावलींचे पालन करण्याचे बंधन घालत गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. याबरोबरच या आठवडय़ात मॉल व स्टोअर्सवरही निर्बंध घातले आहेत.

पालिका प्रशासनाने बार व पबवर निर्बंध घातले असतानाही या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार पालिका प्रशासनाने ६ मार्च रोजी सीबीडी येथील धमाका आणि ‘एपीएमसी’तील क्लब नशा या दोन ‘पब’ला टाळे ठाकले होते. या दोन ‘पब’वर झालेली कारवाई पाहता इतर ठिकाणी नियमांचे पालन होईल अशी अपेक्षा होती, मात्र तरीही करोना नियमांचे पालन न करता बार व ‘पब’मध्ये जल्लोष सुरूच आहे. रात्रसंचारबंदीसह शहर टाळेबंदी होण्याच्या मार्गावर असतानाही हा प्रकार सुरू असल्याने पोलिसांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने आणखी दोन ‘पब’वर कारवाई करीत टाळे ठोकले आहेत. यात वाशी सेक्टर १९ येथील सतरा प्लाझामधील मे. कॅफे अरेबियन नाइट्स अँड ग्रील, एपीएमसी सेक्टर १९, शक्ती आर्केड येथील मे. रंग दे बसंती या दोन पबवर ही कारवाई केली आहे.

‘पब’मध्ये चालणारा प्रकार पाहून करोना संपला असेच वाटत आहे. नियमावलीचे पूर्णपणे उल्लंघन या ठिकाणी आढळून आल्याने ही कारवाई करण्याबाबत पालिकेला कळविले होते. अजूनही काही बार व ‘पब’बाबत तक्रारी आल्या आहेत. याबाबत शहानिशा करून पुढील कारवाई करण्यात येईल.

-सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक