18 January 2019

News Flash

आता भिस्त लोकसंवादावर!

स्वच्छतेचे सर्वेक्षण करून तीन सदस्यांची केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षण समिती परतली आहे.

नवी मुंबई शहर

केंद्रीय समितीचे स्वच्छता सर्वेक्षण पूर्ण; आयुक्तांकडून पुन्हा पाहणी

नवी मुंबई पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विशेषत: सफाई कामगारांनी गेले पाच महिने मेहनत घेऊन केलेल्या स्वच्छतेचे सर्वेक्षण करून तीन सदस्यांची केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षण समिती परतली आहे. या समितीने शहरातील ३०० ठिकाणांना अचानक भेट देऊन पाहणी केली. आता येत्या काही दिवसांत एक वेगळी समिती शहरातील नागरिकांशी दूरध्वनीवरून अचानक संपर्क साधणार आहे. स्वच्छतेबाबत पाच-सहा प्रश्न नागरिकांना विचारण्यात येणार असून या लोकसंवादालाच ३५ टक्के गुण आहेत. यावरच पालिकेला मिळणारे एकूण गुण निश्चित होणार आहेत. केंद्रीय समिती परतल्यानंतरही मंगळवारी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी वाशी, कोपरखैरणे येथील स्वच्छतेची पाहणी केली. ही स्वच्छता आता कायम राहावी यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे.

देशात सध्या सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. यावेळी देशातील साडेचार हजार शहरांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. डिसेंबर माहिन्यात होणारे सर्वेक्षण यंदा तब्बल दोन महिने लांबणीवर पडले. मागील आठवडय़ात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण समितीने दोन दिवस पालिकेने स्वच्छतेसंदर्भात तयार केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर दोन दिवस शहरातील ३०० पेक्षा जास्त ठिकाणांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करून गुण दिले. तिसऱ्या टप्यात रहिवाशांशी थेट संवाद साधला जाणार आहे. त्याचीही जोरदार तयारी पालिकेने केली आहे. १० लाख (बारा लाख लोकसंख्या आहे) संदेश नागरिकांना पाठविले आहेत. यात कोणते प्रश्न समिती विचारू शकले, याची कल्पना देण्यात आली आहे. यापूर्वी दोन लाख पत्रके झोपडपट्टी व ग्रामीण भागांत वाटण्यात आली आहेत. यासाठी एक दोन मिनिटांची ध्वनिफीत तयार करण्यात आली असून ती शहराच्या कानाकोपऱ्यांत ऐकवली जात आहे. या लोकसंवादासाठी चार हजार गुणांपैकी ३५ टक्के गुण ठेवण्यात आले आहेत. ‘स्वच्छ सर्वेक्षण समिती येऊन गेली असून लोकांचा अभिप्राय ते कधीही घेणार आहेत. या निमित्ताने शहरात सुरू झालेला स्वच्छतेचा उत्सव आसाच कायम राहिला पाहिजे. त्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. स्वच्छता म्हणजे नवी मुंबई हे समीकरण रूढ होणे गरजेचे आहे,’ असे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी. एन.  यांनी सांगितले.

संभाव्य प्रश्न

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत विचारण्यात येणारे संभाव्य प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची यादी पालिकेने तयार केली आहे.

*पालिकेने सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाविषयी तुम्हाला माहिती आहे का?

उत्तर : हो आमच्या शहराने या स्वच्छ शहर स्पर्धेत भाग घेतला असून गेल्या वर्षी आम्ही राज्यात पाहिला आणि देशात आठवा क्रमांक पटकावला होता.

* नवी मुंबई मागील वर्षांपेक्षा स्वच्छ आहे का?

उत्तर : होय, नवी मुंबई गेल्या वर्षांपेक्षा जास्त स्वच्छ दिसत आहे. भिंतीवरचे संदेश आर्कषक आहेत.

* सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंडय़ा तुम्ही वापरता का?

उत्तर : होय शहरात ५००पेक्षा जास्त कचराकुंडय़ा ठेवल्या असून त्या वापरण्यास सोयीच्या आहेत.

* कचऱ्याचे वर्गीकरण होते का?

उत्तर : होय शहरातील ८५ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होऊ लागले असून अनेक सोसायटय़ांनी यात भाग घेतला आहे. काही कंपन्यांनी तर खतनिर्मिती सुरू केली आहे.

* सार्वजनिक शौचालयांची काय स्थिती आहे?

उत्तर : शहरात  पुरेशी सार्वजनिक शौचालये असून शहर हागणदारीमुक्त झाले आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक शौचालयांची चांगली देखरेख केली जात आहे.

First Published on February 14, 2018 3:33 am

Web Title: central committee complete the cleanliness survey 2018 in navi mumbai