नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्याला मंजुरी देण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लावणाऱ्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दुसऱ्या टप्यातील विमानळाच्या कामाला मुंजरी देण्याचे संकेत दिले आहेत. सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी मंगळवारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्याबरोबर झालेल्या बैठकीत या संर्दभात माहिती सादर केली आहे. ही मंजुरी येत्या आठवडय़ात मिळण्याची शक्यता असून या मंजुरीनंतर केंद्रीय परवानग्यांचे सर्व सोपस्कर पूर्ण होणार आहेत.

नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग आला आहे. पहिल्या टप्यातील रणवेच्या कामाला कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. सिडकोच्या अखत्यारीतील कामांची नुकतीच निविदा काढण्यात आली आहे. यात उलवा टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचे पात्र बदलणे, सपाटीकरण, उच्च दाबाच्या वाहिन्या भूमिगत करणे या कामांचा समावेश आहे. जानेवारी नोव्हेंबर महिन्यात या कामाची जागतिक निविदा खुली केली जाणार असून जानेवारी महिन्यात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. याच वेळी दुसऱ्या टप्यात येणाऱ्या दुसऱ्या रणवेच्या मंजुरीसाठी सिडकोने प्रयत्न सुरु केले असून त्या संर्दभात राधा यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला आवश्यक असणारी माहिती दिली आहे. त्यामुळे या विमानतळासाठी लागणाऱ्या परवानग्यांची पूर्तता होणार आहे. नवी मुंबईचे विमानतळ २२६८ हेक्टर जमिनीवर उभारले जाणार असून त्यातील ११६० हेक्टर जमिनीवर मुख्य गाभा आहे. या मुख्य गाभ्यात ग्रीनफिल्ड प्रकारातील या विमानतळावर दोन रनवे उभारण्यात येणार असून केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१२ रोजी पहिल्या टप्यातील पहिल्या रणवेच्या उभारणीला मंजुरी दिलेली आहे. दुसऱ्या टप्यात येणाऱ्या रणवेचा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला आराखडा सादर करण्यात आला आहे. कामाला गती देण्यास सुरुवात केली आहे.